सर्व आवृत्तींसाठी
-----------------
पहिली स्वदेशी बुलेट ट्रेन आकारास; ताशी अडीचशे किमीचा वेग
---------
बंगळुरू येथील प्रकल्पात उत्पादन सुरू ः ५५७ प्रवाशांची क्षमता, स्वयंपूर्णतेकडे पाऊल
----------
सकाळ वृत्तसेवा
नाशिकरोड, ता.१ : भारतीय रेल्वेच्या वेगवान प्रवासाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल पडत असून, देशातील पहिल्या स्वदेशी बुलेट ट्रेनची निर्मिती बंगळुरू येथील बीईएमएलच्या उत्पादन प्रकल्पात सुरू आहे. मुंबई- अहमदाबाद हायस्पीड रेल्वे मार्गासाठी तयार होत असलेली ही ट्रेन ताशी २४९ किलोमीटर वेगाने धावणार आहे. मुंबईशी रेल्वेने जोडलेल्या नाशिक आणि नाशिकरोड परिसरातील प्रवाशांसाठीही या आधुनिक रेल्वे प्रकल्पाला विशेष महत्त्व आहे. रेल्वे तंत्रज्ञानातील बदलामुळे रेल्वेची बुलेट ट्रेनबाबत स्वयंपूर्णतेकडे वाटचाल सुरु झाली आहे.
----------------
रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या बुलेट ट्रेनच्या चाचणीवेळी कमाल वेगमर्यादा ताशी २८० किलोमीटर, तर नियमित प्रवासाचा वेग ताशी २४९ किलोमीटर असेल. सुमारे २०२ मीटर लांबीच्या या ट्रेनमध्ये आठ डबे असतील. चार मोटार कार आणि चार ट्रेलर कार अशी त्यांची रचना आहे. ट्रेनमधून एकावेळी सुमारे ५५७ प्रवाशांना प्रवास करता येईल. भविष्यात दोन आठ डबे जोडून १६ डब्यांची ट्रेन चालविण्याची सुविधाही असेल.
प्रवासासाठी आधुनिक सुविधा
या बुलेट ट्रेनमधील प्रवासी सुविधांकडे लक्ष वेधले जात आहे. भारतीय प्रवाशांच्या शारीरिक गरजा लक्षात घेऊन आसनांची रचना करण्यात आली आहे. पुरेशी पाय मोकळी ठेवण्याची जागा, एलईडी प्रकाशयोजना, सामानासाठी स्वतंत्र रॅक, मोबाईल व लॅपटॉप चार्जिंगसाठी पॉवर आउटलेट, आधुनिक स्वच्छतागृहे आणि प्रत्येक आसनाच्या रांगेत मोठ्या खिडक्या असतील.
१६-१
प्रवाशांना तीन भाषांमध्ये माहिती
ट्रेनमधील एलसीडी स्क्रीनवर इंग्रजी, हिंदी आणि प्रादेशिक भाषांमध्ये प्रवासाची माहिती दिली जाणार आहे. ध्वनिक्षेपक आणि स्वयंचलित उद्घोषणा प्रणालीद्वारे सूचना मिळतील. आपत्कालीन परिस्थितीत प्रवाशांना रेल्वे कर्मचाऱ्यांशी संपर्क साधता यावा यासाठी विशेष संवाद यंत्रणा आणि वाय-फाय आधारित मनोरंजन सुविधाही उपलब्ध असेल. दिव्यांग आणि कमी हालचाल क्षमता असलेल्या प्रवाशांना सहज प्रवास करता यावा, यासाठी ट्रेनची रचना करण्यात आली आहे. फलाट आणि डब्याची उंची समान ठेवण्याची व्यवस्था, व्हीलचेअर अनुकूल दरवाजे, विशेष आसनव्यवस्था, स्वच्छतागृहे आणि ब्रेल लिपीतील माहिती फलक उपलब्ध असतील.
१६-२ चौकट
ऊर्जा बचत, आवाजावर नियंत्रण
प्रत्येक डब्यात दोन वातानुकूलन युनिट्स असतील. प्रवासादरम्यान योग्य तापमान आणि आर्द्रता राखण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. ध्वनिरोधक साहित्य, आवाज शोषून घेणारे विशेष आवरण आणि चाकांजवळील संरक्षक कवचांमुळे प्रवासातील आवाज कमी होण्यास मदत होईल. ट्रेन २५ केव्ही, ५० हर्ट्झ सिंगल फेज एसी विद्युत प्रणालीवर धावणार असून, ब्रेक लावताना निर्माण होणारी ऊर्जा पुन्हा वापरणारी रिजनरेटिव्ह ब्रेकिंग प्रणालीही असेल.
------------