फोटो : B13005
इंदिरानगर : रस्त्यात बस उभ्या करून देवाण-घेवाण करताना चालक.
--
भररस्त्यात बस उभ्या करून गप्पा
इंदिरानगरमध्ये सिटीलिंक चालकांचा बेशिस्तपणा
इंदिरानगर, ता. २६ : शनिवारी (ता. २४) विनयनगर चौकात सिटीलिंक बसच्या भरधाव वेगामुळे वाहकच खाली पडल्याची घटना ताजी असताना सोमवारी (ता. २६) पुन्हा रथचक्र चौक परिसरात निवांत गाड्या उभ्या करून गप्पा आणि देवाणघेवाण करणाऱ्या चालकांना बघून इंदिरानगरवासीयांनी कपाळावर हात मारून घेतला आहे.
भररस्त्यात वाहने उभी करून गप्पा मारण्याच्या प्रकारामुळे प्रवाशांसह स्थानिक नागरिक तीव्र संताप व्यक्त करत आहेत. बसमधून पडलेला वाहक गंभीर जखमी झाला होता. आता पुन्हा रस्त्याच्या मधोमध बस उभ्या करून वाहतूक अडवण्याचा प्रकार समोर आला. बस उभ्या करून, गप्पा मारून आणि काहीतरी देवाणघेवाण करून मार्गस्थ होईपर्यंत नागरिकांना या बसला वळसा घालून मार्गस्थ व्हावे लागले. एका बाजूला रस्त्यावरून जाणाऱ्या इतर वाहनधारकांना कसरत करावी लागत होती, तर दुसऱ्या बाजूला बसमध्ये बसलेले नागरिक बस कधी पुढे निघणार, या प्रतीक्षेत होते. या बेशिस्तपणाबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी योग्य ती दखल घेण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.