गुन्हे वृत्त
--
कर्मचाऱ्याकडून
महिलेचा विनयभंग
इंदिरानगर : गॅस कनेक्शन बसवण्यासाठी आलेल्या एमएनजीएल कंपनीच्या अनोळखी कर्मचाऱ्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार श्री रविशंकर मार्गावरील एका अपार्टमेंटमध्ये कंपनीच्या गॅस कनेक्शनसाठी एक कारागीर आला होता. या इमारतीतील महिलेच्या घरातील गॅस कनेक्शन बसवल्यानंतर स्वच्छतेसाठी त्याने विम लिक्वीडची मागणी केली. त्यावेळी अनोळखी कर्मचाऱ्याने महिलेचा विनयभंग केला.
--
व्हिडिओ व्हायरल
करण्याची धमकी
इंदिरानगर : फोटो आणि व्हिडिओ व्हायरल आणि आई- वडील व मुलाला मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी इंदिरानगर पोलिसांनी संशयित संदीप निरभवणे याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित निरभवणे याने २०२२ ते जानेवारी २०२६ दरम्यान फिर्यादी महिलेसोबत जबरदस्तीने पाथर्डी फाटा भागातील राहत्या घरी आणि खाजगी हॉटेलमध्ये शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यादरम्यानचे फोटो आणि व्हिडिओ मोबाईलमध्ये घेतले. ते व्हायरल करण्याचे आणि आई- वडील व मुलाला मारण्याची धमकी दिली.
--
एपिके फाईलद्वारे
दीड लाख गायब
इंदिरानगर : एमएनजीएल कंपनीची अपडेट म्हणून आलेली एपीके फाईल डाऊनलोड केल्याने लीलाधर जनार्दन पाटील (रा. संपदा अपार्टमेंट, इंदिरानगर) यांच्या आयसीआयसीआय बँकेच्या क्रेडिट कार्डमधून सुमारे दीड लाखाची रक्कम गायब झाली. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाटील यांना १० नोव्हेंबरला दुपारी १२.४५ वाजता ही एपीके फाईल व्हॉट्सअपद्वारे प्राप्त झाली. ती त्यांनी उघडली. त्यानंतर १ वाजून १३ मिनिटांनी त्यांच्या उपरोक्त बँकेच्या क्रेडिट कार्डमधून ओटीपीद्वारे १ लाख ४८ हजार ८६९ रुपये काढून घेतल्याचे त्यांच्या लक्षात आले.