फोटो -NSK26H34466
नाशिक : के. के. वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘आविष्कार २०२६’ विभागीय स्पर्धेप्रसंगी बोलताना डॉ. राम कुलकर्णी. शेजारी डॉ. नूतन सदगीर, प्राचार्य डॉ. के. एन. नांदूरकर, डॉ. पी. जे. पवार, डॉ. रवींद्र मुंजे.
नावीन्यपूर्ण विचार दैनंदिन
जीवनाचा अविभाज्य भाग व्हावा
-----------------------------
डॉ. कुलकर्णी : ‘आविष्कार’ स्पर्धा
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ४ : सर्जनशीलता आणि नावीन्यपूर्ण विचार हे केवळ स्पर्धांपुरते मर्यादित न राहता ते समाजाच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग व्हावेत. नावीन्यपूर्ण विचारांचा उपयोग वास्तविक जीवनातील समस्या सोडवण्यासाठी करून आपले जीवन अधिक अर्थपूर्ण, समृद्ध आणि उद्देशपूर्ण व्हावे, असे प्रतिपादन गोखले एज्युकेशन सोसायटीचे विभागीय सचिव डॉ. राम कुलकर्णी यांनी केले.
के. के. वाघ शिक्षण संस्था संचलित के. के. वाघ अभियांत्रिकी शिक्षण संशोधन संस्थेत नुकताच ‘आविष्कार २०२६’ या विभागीय संशोधन स्पर्धा पार पडल्या, त्या प्रसंगी ते बोलत होते. प्राचार्य डॉ. के. एन. नांदुरकर यांनी प्रमुख पाहुणे डॉ. कुलकर्णी यांचा सत्कार केला. व्यासपीठावर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रतिनिधी डॉ. नूतन सदगीर, महाविद्यालयाचे विभागप्रमुख डॉ. पी. जे. पवार, डॉ. रवींद्र मुंजे हे उपस्थित होते. या वेळी संस्थेचे अध्यक्ष समीर वाघ, जनसंपर्क संचालक अजिंक्य वाघ, सचिव प्रा. के. एस. बंदी यांनी मार्गदर्शन केले.
जिल्ह्यातील पदवी व पदव्युत्तर महाविद्यालयांमधील ६०० हून अधिक विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. स्पर्धेत वाणिज्य, व्यवस्थापन व विधी तसेच औषधनिर्माणशास्त्र व वैद्यकीय विज्ञान या दोन श्रेणींचा समावेश होता. विद्यार्थ्यांनी नावीन्यपूर्ण संशोधन प्रकल्पांचे पोस्टरच्या माध्यमातून सादरीकरण केले. प्रथम व द्वितीय क्रमांक प्राप्त स्पर्धक विद्यापीठ स्तरावरील स्पर्धेत सहभागी होणार आहेत. महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. रवींद्र मुंजे यांनी स्पर्धकांना स्पर्धेचे स्वरूप व नियमावली बाबत माहिती दिली. डॉ. नूतन सदगीर यांनी स्वागत केले.