Inspirational News : गोळा नव्हता म्हणून दगडाने केला सराव... दिव्यांग जना टोपलेंचे राष्ट्रीय स्पर्धेत ‘सुवर्ण’ यश!

inspirational disabled jana topale (Middle) win gold medal in national competition nashik news
inspirational disabled jana topale (Middle) win gold medal in national competition nashik newsesakal

किरण कवडे : सकाळ वृत्तसेवा

Inspirational News : जन्मतःच दोन्ही पायांना लाभलेले दिव्यांगत्व आणि घरातील आर्थिक अडचणींवर मात करत नाशिकच्या जना सावळीराम टोपले यांनी दिल्लीतील राष्ट्रीय स्पर्धेत गोळाफेक व थाळीफेक प्रकारात सुवर्णपदके पटकावली. (inspirational disabled jana topale win gold medal in national competition nashik news)

विशेष म्हणजे सराव करण्यासाठी गोळा उपलब्ध नसताना त्यांनी दगडाने सराव केला. या ‘दगडाने’ सुवर्णवेध घेतल्यानंतर त्यांची कंबोडिया येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. दिव्यांग असला तरी खचून न जाता जिद्दीच्या बळावर त्यांनी एम. ए, बी. एड. पर्यंत शिक्षण घेतले.

सुरगाणा तालुक्यातील बेहुडने गावात जन्मलेल्या जना टोपलेंच्या गावापर्यंत बस अजूनही पोचलेली नाही. आईवडिलांचे पहिलेच अपत्य म्हणजे जना आणि तिलाही दोन्ही पायांना दिव्यांगत्व लाभलेले. गावात प्राथमिक शिक्षण झाल्यानंतर बाहेरगावी शिक्षणासाठी अगोदरच पैशांची चणचण त्यात, जनाचे दिव्यांगत्व.

त्यामुळे लहानपणीच शाळेला विरोध सुरू झाला. पण, आपण जिद्द सोडायची नाही म्हणून जनाने शिक्षणाचा आग्रह धरला. मराठी विषयात बी.ए. सुरगाण्यात पूर्ण केले. त्यानंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून एम. ए. केले. आपण गावाकडे परत गेलो तर शिक्षणाला पूर्णविराम मिळेल म्हणून तिने पुण्यातच एका खासगी कंपनीत नोकरी शोधली आणि बी.एड.चे शिक्षण घेतले.

त्यानंतर २०१७ मध्ये काशिनाथ पाडवी यांच्याशी त्यांचा विवाह झाला. पतीसोबत एक वर्षे मजुरी करत जना टोपलेंनी आपला संसार उभा केला. संसाराची तारेवरची कसरत सुरू असताना एक दिवस अचानक खंडू कोटकर यांची भेट झाली आणि त्यांनी खेळाविषयी माहिती दिली. २०१९ मध्ये जनाने क्रिकेट खेळायला सुरवात करत पहिला सामना पुण्यात खेळला.

महाराष्ट्राने गुजरात संघाला हरवले म्हणून राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली. २०२० मध्ये अॅथलेटिक्स स्पर्धेत भाग घेतला. गोळा व थाळीफेक प्रकारात सहभाग नोंदवला; पण सराव करायला गोळा नव्हता म्हणून दगडानेच त्यांनी सराव केला. तर थाळी नव्हती म्हणून दोन तवे उलटे जोडून थाळी बनवली.

या स्पर्धेत कास्यपदक मिळाले म्हणून २०२३ मध्ये ता. ६ व ७ जानेवारीला ‘एटीटीएफ’ महाराष्ट्र असोसिएशन या संस्थेच्या पाचवी दिव्यांग राष्ट्रीय स्पर्धा जवाहरलाल नेहरू स्टेडिअम दिल्ली येथे झाल्या. या स्पर्धेत जनाने पहिला क्रमांक पटकावला.

दोन सुवर्णपदक मिळवले. दिव्यांगावर मात करत तिने आंतरराष्ट्रीय स्पर्धेपर्यंत मजल गाठली आहे. कंबोडिया येथे पुढील वर्षी होणाऱ्या स्पर्धेसाठी तिला आर्थिक पाठबळाची आवश्यकता आहे.

शासकीय अधिकारी होण्याचे स्वप्न

दिव्यंगावर मात करून उच्चशिक्षण घेतले. क्रीडा क्षेत्रात सुवर्णपदक मिळवले. पण आर्थिक स्थैर्य मिळवण्यासाठी शाश्वत उत्पन्नाचा स्रोत खूप महत्त्वाचा असतो. त्यासाठी जना टोपले आता एमपीएससीचा अभ्यास करत आहे. दोन वेळा तिला यशाने हुलकावणी दिली. पण त्याने खचून न जाता पुन्हा जोमाने तयारीला लागत तिने अभ्यास सुरू केला आहे. शासकीय अधिकारी होण्याचे तिचे स्वप्न आहे.

गीतेतील अध्याय तिसरा : सत्कर्म

यद्यदाचरति श्रेष्ठस्तत्तदेवेतरो जनः ।

स यत्प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते॥

अर्थ : श्रेष्ठ मनुष्य जे जे आचरण करतो, त्या त्या प्रमाणेच इतर लोकही आचरण करतात; तो जे काही प्रमाण म्हणून सांगतो, त्याप्रमाणेच सर्व मनुष्यसमुदाय वागू लागतो. त्यामुळे मनुष्याने आपले जीवनकार्य सकारात्मक पद्धतीने केले पाहिजे. त्याचे फळ निश्चितपणे मिळते.

inspirational disabled jana topale (Middle) win gold medal in national competition nashik news
Nashik School Opening: मालेगाव तालुक्यात शाळा प्रवेशोत्सवाची जय्यत तयारी! मुलांच्या गोडधोड जेवणाचा बेत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com