
International Constitution Tour : आंतरराष्ट्रीय संविधान यात्रा नाशिकमध्ये दाखल
नाशिक : भारत, भूतान, नेपाळ दुचाकी यात्रा नाशिकमध्ये दाखल झाली. यात्रेतील दुचाकीस्वारांचे स्वागत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या नाशिक शाखेच्या वतीने स्वागत करण्यात आले.
भारत, भूतान, नेपाळ या तीन देशांमध्ये दुचाकीवरून यात्रेचे नियोजन करण्यात आले. तर्कशील सोसायटी पंजाबचे ॲड. हरिंदर लॅली, तर्कशील सोसायटी भारतचे डॉ. राजाराम हंडियाना, डॉ. राजेश पेगन १६ मार्च पासून दुचाकीवरून तीन देशांची यात्रेस निघाले आहेत. (International Constitution Tour entered Nashik news)
नागरिकांमध्ये संविधानात सांगितलेल्या कर्तव्यांची जाणीव करून देण्यासाठी यात्रा काढण्यात आली आहे. यात्रेचे प्रमुख ॲड. हरिंदर लॅली म्हणाले, की जादूटोणा विरोधी, अंधश्रद्धा विरोधी अस्तित्वात असलेल्या इंडियन पीनल कोडमधील कायद्यांचा प्रचार आणि प्रसार केला पाहिजे.
युवा पिढीला विवाह विषयक स्वातंत्र्य देणे आवश्यक असून, विशेष विवाह कायद्यानुसार विवाहांची नोंद आवश्यक आहे. युवकांचे शरीर, विचार स्वास्थ्य आवश्यक असल्याने राज्यघटनेतील नागरिकांची कर्तव्याचे पालन होणे गरजेचे आहे.
हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??
यात्रेतील दुसरे सहकारी डॉ. राजाराम हंडियाना म्हणाले, सर्व धार्मिक पूजा-अर्चा, कर्मकांड करूनदेखील अस्तिकांच्या आयुष्यातील समस्या का आहेत याचा विचार होणे आवश्यक आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य प्रधान सचिव डॉ. ठकसेन गोराणे यांनी समितीच्या कार्यपद्धतीची माहिती दिली.
प्रास्ताविक व सूत्रसंचालन समन्वयक प्रा. डॉ. सुदेश घोडेराव यांनी केले. आभार नितीन बागूल यांनी मानले. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कृष्णा चांदगुडे, प्रल्हाद मिस्त्री, महेंद्र दातरंगे, ॲड समीर शिंदे, अरुण घोडेराव, विजय खंडेराव, प्रभाकर शिरसाट, यशदा चांदगुडे, डॉ. मिलिंद वाघ उपस्थित होते. यात्रा दुपारनंतर मुंबईकडे मार्गस्थ झाली.