फोटो : H32393
नाशिक : बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या ऐवजावर डल्ला मारून चोरी करणारे संशयित व जप्त मुद्देमाल. समवेत शहर गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त संदीप मिटके व युनिट एकचे पथक.
प्रवाशांचा ऐवज लांबवणारी आंतरराज्यीय टोळी जेरबंद
गुन्हे शाखा युनिट एकची कामगिरी; २४ लाखांचे दागिने जप्त; १० गुन्ह्यांची उकल
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १४ : शहरातील बसस्थानकांवर गर्दीचा फायदा घेऊन महिला व वृद्ध प्रवाशांचे दागिने लांबविणाऱ्या उत्तर प्रदेशातील आंतरराज्य टोळीच्या गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने मुसक्या आवळल्या आहेत. अटक करण्यात आलेल्या दोघांकडून २४ लाख ४३ हजार रुपये किमतीचे १६३ ग्रॅम सोने जप्त केले असून, १० गुन्ह्यांची उकल झाली आहे.
जावेद अब्दुल गफ्फार (४०, रा. मोहल्ला चाहशिरीन, जि. बिजनौर, उत्तर प्रदेश), अरुणकुमार प्रेमदत्त शर्मा (५६, रा. सिकरी बुजुर्ग, जि. बिजनौर, उत्तर प्रदेश) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. बसस्थानक परिसरात गर्दीचा फायदा घेऊन चोऱ्या करणारी टोळी सक्रिय असल्याची खबर युनिट एकच्या पथकाला मिळाली असता, अंमलदार आप्पा पानवळ, गोरक्ष साबळे, राम बर्डे, मुक्तार शेख यांनी बसस्थानक परिसरात सापळा रचून दोन्ही संशयितांना शिताफीने ताब्यात घेतले. सखोल चौकशीत त्यांनी सरकारवाडा, पंचवटी आणि मुंबई नाका ठाण्याच्या हद्दीतील बसस्थानकात चोरी केल्याची कबुली दिली. संशयितांकडून जप्त केलेल्या सोन्याच्या दागिन्यांच्या आधारे सरकारवाड्याच्या हद्दीतील ठक्कर व मेळा बसस्थानकातील ७, मुंबई नाका हद्दीतील महामार्ग बसस्थानकातील २ आणि पंचवटीच्या निमाणी बसस्थानकात एक, असे एकूण १० चोरीच्या गुन्ह्यांची उकल झाली आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. अंचल मुदगल, सहायक निरीक्षक विश्वास चव्हाणके, जया तारडे, उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, दत्तात्रेय पोटे, रमीज शेख, राम शिंदे, अंमलदार आप्पा पानवळ, गोरक्ष साबळे, राम बर्डे, मुक्तार शेख व युनिट एकच्या पथकाने ही कामगिरी केली.
--चौकट
अशी होती कार्यपद्धती
संशयित दोघेही बसस्थानकाच्याच आवारात रहायचे. बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांची गर्दी झाली की दोघांपैकी एक मदतीच्या बहाण्याने वा गर्दीत शिरायचा, तर दुसरा त्या प्रवाशाच्या बॅगेतील ऐवज वा गळ्यातील चैन खेचून पसार व्हायचे. संशयितांकडून चोरीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.