Latest Marathi News | आडगावात अनियमित घंटागाड्या; जागोजागी कचऱ्याचे ढीग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Garbage in city

Nashik : आडगावात अनियमित घंटागाड्या; जागोजागी कचऱ्याचे ढीग

नाशिक : शहरापासून सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या व महापालिका हद्दीतील आडगाव शिवारात गेल्या अनेक दिवसांपासून घंटागाड्या नियमित येत नाहीत. त्यामुळे घरातील कचरा इतरत्र टाकून देण्याकडे नागरिकांचा कल वाढला असून, जागोजाग कचऱ्याचे ढीग साचले आहेत. याशिवाय मळे वस्तीतील पथदीपही अनेक दिवसांपासून बंदच आहेत. (Irregular garbage trucks in adgaon Piles of garbage everywhere Nashik Latest Marathi News)

नाशिक महापालिकेत समाविष्ट झालेल्या गावांपैकी सर्वात मोठे गाव म्हणून आडगावची ओळख आहे. अनेक गावकरी मळ्यात वस्तीला गेले तरी अद्यापही गावात मोठ्या प्रमाणावर गावकरी राहतात. याशिवाय शहरी भागातील घरभाडे परवडत नसल्याने अनेकांनी गावात भाड्याची घरे घेतली आहे. त्यामुळे पूर्वीपेक्षा गावातील लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे गावकरी सांगतात.

गत महिन्यापासून गावात घंटागाड्या नियमित येत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. घंटागाडी येत नसल्याने किंवा अवेळी येत असल्याने अनेकजण गावालगत मोकळ्या जागेत कचरा टाकून देत आहेत. यामुळे डासांच्या प्रमाणातही मोठी वाढ झाली आहे. एकीकडे शहरात डेंगी, मलेरिया, साथजन्य रोगांची साथ सुरू असतानाच कचऱ्याचे ढीग ग्रामस्थांची चिंता वाढविणारे आहेत. संपूर्ण गावात डास निर्मुलन मोहीम राबवावी, अशी मागणी आहे.

हेही वाचा: 5G Fraud Alert : सावधान! तुमचीही होऊ शकते फसवणूक

सर्पदंशांचा धोका

महापालिकेतर्फे गाव व परिसरात पथदीप बसविण्यात आले आहेत, मात्र पावसाळी वातावरणात त्यातील अनेक पथदीप बंदच आहेत. एखाद्या भागातील पथदीप बंद झाल्यावर महिनोमहिने त्याकडे लक्षच दिले जात नसल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. पावसाळ्यामुळे सर्प बिळांतून बाहेर येत असल्याने सर्पदंशांचाही धोका वाढला आहे.

"गत महिन्यापासून अनियमित घंटागाडीबाबत नागरिकांच्या तक्रारी येत आहेत. याबाबत संबंधित विभागांना कळवूनही दखल घेतली जात नाही. त्यामुळे दिवाळीपूर्वी प्रभागातील नागरिकांसह मनपावर कचराफेक आंदोलन करण्यात येईल."

- शीतल माळोदे, माजी नगरसेविका, आडगाव

"गत महिन्यापासून आडगावात नियमित घंटागाडी येत नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले आहेत. याशिवाय बऱ्याच भागातील पथदीपही बंदच आहेत."

- विद्या शिंदे, आडगाव

हेही वाचा: Nashik Crime News : कातरवाडी येथील तरुण शेतकऱ्याच्या खूनाचा 48 तासांत छडा