
Sanjay Raut: "शरद पवारांना समजून घ्यायला शंभर जन्म घ्यावे लागतील"; राऊतांचा भाजपला टोला
नाशिक : पहाटेच्या शपथविधीमुळं राष्ट्रपती राजवट उठवण्यास मदत झाल्याचं विधान नुकतंच शरद पवारांनी केलं होतं. त्यांच्या या विधानाला अनुसरुन प्रतिक्रिया देताना शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊ यांनी भाजपला टोला लगावला आहे. शरद पवारांना समजून घ्यायला शंभर जन्म घ्यावे लागतील, असा पुनरुच्चार त्यांनी केला. नाशिकमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. (It takes hundred births to understand Sharad Pawar Sanjay Raut challenge to BJP)
राऊत म्हणाले, "जे सरकार दिल्लीत आणि महाराष्ट्रात होतं त्यांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावून महाविकास आघाडीचं सरकार येऊ नये म्हणून कोंडी केली होती. ती कोंडी फुटेल की नाही अशा शंका सगळ्यांना होत्या. आम्ही आमदारांचं बहुमत जरी दाखवलं असतं तरी ज्या प्रकारचे राज्यपाल राजभवनात होते. त्यांनी बहुमताची डोकी मोजायलाच पाच वर्षे घेतली असती, जे की आपण पाहतोच आहोत निवडणूक आयोगात काय सुरु आहे.
पण पहाटेच्या शपथविधीमुळं ही कोंडी फुटली आणि लख्ख उजाडलं. फक्त २४ मिनिटांत राष्ट्रपती राजवट निघाली दिल्लीतून आणि मविआचा मार्ग नक्कीच त्यामुळं मोकळा झाला. हे जे पवारांनी सांगितल्याचं तुम्ही सांगता तर हे सत्य आहे. शरद पवारांना ओळखायला शंभर जन्म घ्यावे लागतील असं मी मागे एकदा म्हटलं होतं तेव्हा माझ्यावर टीका झाली होती. तुम्हाला आता कळलंच असेल. पण यासाठी मी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे आभार मानतो की त्यांनी ही कोंडी फोडायला मदत केली.
हे ही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!
पवारांना पहाटेच्या शपथविधीबाबत माहिती होतं की नाही याबाबत मला माहिती नाही. पण राजकीय कोंडी फोडायला त्या शपथविधीमुळं नक्कीच मदत झाली. दिल्लीतून कायमच महाराष्ट्रात आक्रमणं झालीत. महाराष्ट्र कायम दिल्लीच्या राजवटीशी लढत राहिला हा इतिहास आहे. शिवसेनेच्या अस्तित्वावर घाला घालण्याचा प्रयत्न दिल्लीतून होत आहे, असंही राऊत यावेळी म्हणाले.