NSK26H35232
जळगाव : जुने जळगाव येथील रथ मार्गातील खड्डे दुरुस्तीची पाहणी करताना महापौर दीपमाला काळे, नगरसेवक कल्पेश सोनवणे तसेच आदी महापालिकेचे अधिकारी.
...
रथोत्सव मार्गावरील अडथळे दूर करा
महापौरांकडून रथ मार्गाची पाहणी; रस्त्यांची डागडुजी, केबल हटविण्याच्या सूचना
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १७ : ऐतिहासिक रथोत्सव निर्विघ्नपणे पार पडावा आणि रथाच्या मार्गात कोणताही अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी महापालिका प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर महापौर दीपमाला काळे यांनी मंगळवारी (ता. १७) श्रीराम मंदिर संस्थानपासून जुने जळगाव परिसरातील संपूर्ण रथोत्सव मार्गाची पाहणी केली. यावेळी रस्त्यांची दुरुस्ती, लोंबकळणाऱ्या विद्युत केबल्स हटविणे आणि पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित विभागांना दिले.
रथोत्सवाच्या वेळी रथ मार्गावरून जाताना विद्युत तारांमुळे किंवा अन्य अडथळ्यांमुळे अडचण निर्माण होऊ नये, यासाठी महापौरांनी मार्गाची प्रत्यक्ष पाहणी केली. रस्त्याच्या मधोमध आलेल्या तसेच रथाच्या उंचीला अडथळा ठरू शकणाऱ्या विद्युत केबल्स तातडीने बाजूला करण्याचे आदेश विद्युत विभागाला दिले. तसेच मार्गावरील खड्डे बुजविणे, खराब रस्त्यांची डागडुजी करणे आणि प्रलंबित कामे रथोत्सवापूर्वी पूर्ण करण्याच्या सूचना शहर अभियंता व संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. या पाहणीवेळी नगरसेवक कल्पेश सोनवणे, शहर अभियंता आर. टी. पाटील, अभियंता जितेंद्र रंधे, पोलीस पाटील प्रभाकर पाटील यांच्यासह महापालिकेचे विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
चौकट
पाणीपुरवठा सुरळीत ठेवा
रथोत्सवासाठी मोठ्या संख्येने भाविक आणि नागरिक जुने जळगाव परिसरात येतात. त्यामुळे गर्दीच्या काळात पाणीपुरवठ्यात कोणताही व्यत्यय येऊ नये, यासाठी आवश्यक नियोजन करण्याचेही महापौरांनी स्पष्ट केले.