धुळे ः टुडे १ साठी, मेन
---
लोगो छायाचित्र : पाण्याचा थेंब घेणे
---
जलजीवन मिशनच्या वाहन संख्येला कात्री
-
धुळ्याला ४, नंदुरबारला ५ वाहने मंजूर; संनियंत्रणावर परिणाम शक्य
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. २६ : राज्यात दुष्काळी स्थितीचे सावट गडद होत असताना जलजीवन मिशनअंतर्गत अपूर्ण पाणीपुरवठा योजना तातडीने पूर्ण करण्याचे मोठे आव्हान स्थानिक प्रशासनासमोर उभे ठाकले आहे. असे असतानाच या योजनांच्या अंमलबजावणी व थेट संनियंत्रणासाठी (मॉनिटरिंग) आवश्यक असलेल्या वाहनांची संख्या शासनाने थेट निम्म्यावर आणली आहे. उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक व अहिल्यानगर या पाच जिल्ह्यांतील वाहनांची संख्या आता ३५ वर सीमित करण्यात आली आहे.
-
राज्य पाणी व स्वच्छता मिशनच्या अभियान संचालकांनी जारी केलेल्या नवीन आदेशानुसार राज्यातील ३४ जिल्हा परिषदांसाठी पूर्वी मंजूर असलेल्या ४५३ वाहनांऐवजी आता केवळ २२० वाहनांनाच मंजुरी देण्यात आली आहे. या कपातीमुळे कामांचे संनियंत्रण, प्रत्यक्ष स्थळपाहणी आणि गुणवत्तेच्या तपासणीवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
-
पाहणीचे आव्हान
जलजीवन मिशनची अंमलबजावणी जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत केली जाते. प्रत्येक घरापर्यंत नळाद्वारे पाणी पोहोचवणे, जलकुंभ उभारणे, पाइपलाइनचा विस्तार करणे आणि विहिरींची निर्मिती करणे ही मुख्य उद्दिष्टे आहेत. या कामांना गती देण्यासाठी २०२२- २०२३ च्या कृती आराखड्यानुसार कंत्राटी तत्त्वावर वाहने भाड्याने घेण्याची तरतूद होती. मात्र, नव्या कपातीमुळे आता दोन उपविभागांसाठी अवघे एकच वाहन वापरावे लागत आहे. जिल्ह्यातील धुळे शहर व तालुका, शिरपूर, शिंदखेडा व साक्री, तसेच नंदुरबार शहर व तालुक्यासह शहादा, नवापूर, अक्कलकुवा, तळोदा आणि धडगाव तालुका आणि अक्कलकुवा, धडगाव यांसारख्या दुर्गम व भौगोलिकदृष्ट्या विस्तारलेल्या भागांत अधिकारी प्रत्यक्ष कामांवर देखरेख कशी ठेवणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
-
थकबाकी अन् संकट
जलजीवन मिशनच्या कामांची कोट्यवधी रुपयांची देयके (बिल) प्रलंबित असल्याने कंत्राटदारांमध्ये आधीच असंतोष आहे. त्यातच आता वाहनांना कात्री लागल्यामुळे कामाचा दर्जा तपासणे अधिक कठीण होणार आहे. एक ऑगस्टपासून वाहनांचे सुधारित भाडेदर लागू करण्यात आले असले, तरी या वाहनकपातीमागील नेमके कारण आणि देखरेखीची पर्यायी व्यवस्था काय, याबाबत प्रशासनाने अजून स्पष्टता दिलेली नाही. ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत पिण्याचे पाणी वेळेत पोहोचवण्यासाठी प्रशासकीय मंजुरीसोबतच तांत्रिक पाहणीची गती टिकवणे आवश्यक आहे. त्यामुळे उपलब्ध वाहनांच्या ताफ्यात कामांची नियमित पाहणी कशी होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
-
१४-१
...चौकट...
१४-१
वाहन वाटप
धुळे : ४
नंदुरबार : ५
जळगाव : ९
नाशिक : ९
अहिल्यानगर : ८
एकूण : ३५