पान-२ ॲंकर
------
हा फोटो फक्त २ कॉ
NMN26B04520
निमोण (ता. चांदवड) ः येथे जलतारा योजनेबाबत झालेल्या बैठकीत मार्गदर्शन ग्रामस्थांना करताना सहाय्य्क गटविकास अधिकारी थोरात.
----------
जलतारा योजना गावोगावी चळवळ बनली पाहिजे!
-----------
थोरात ः दुष्काळी स्थितीमुळे भूजलपातळी वाढविण्यासह शेतकरी व मजुरांना रोजगाराची संधी
-----------
सकाळ वृत्तसेवा
चांदवड- निमोण,ता.१९ : दुष्काळी परिस्थितीवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी पावसाचे पाणी अडविणे आणि जमिनीत जिरविणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी जलतारा योजना ही गावोगावी एक लोकचळवळ झाली पाहिजे. ही योजना प्रभावीपणे राबविल्यास भूजलपातळी वाढण्यास मदत होईल, दुष्काळी परिस्थितीत शेतकरी आणि शेतमजुरांना रोजगारही उपलब्ध होईल, असे प्रतिपादन चांदवड पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी सी. एम. थोरात यांनी केले.
-------------
निमोण येथे पीएम सूर्यघर मोफत वीज योजना व जलतारा योजनेबाबत झालेल्या मार्गदर्शन कार्यशाळेत ते बोलत होते. श्री. थोरात म्हणाले की, पावसाचे पाणी वाहून जाऊ न देता ते जमिनीत मुरविणे ही काळाची गरज बनत चालली आहे. जलतारा प्रकल्पाच्या माध्यमातून शेतातील पाणी जमिनीत मुरवून भूजल पुनर्भरण करण्यास मदत होते. यामुळे विहिरींची पाणीपातळी टिकविणे, जमिनीतील ओलावा वाढविणे आणि अतिवृष्टीच्या वेळी शेतात पाणी साचण्याची समस्या कमी करणे शक्य होते. प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या शेतातील उताराच्या योग्य ठिकाणी जलतारा तयार करण्यासाठी पुढाकार घ्यावा. ग्रामपंचायतीनेही या कामाचे नियोजन करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना योजनेत सहभागी करून घ्यावे. भविष्यातील पाणीटंचाई रोखण्यासाठी आजच जलसंधारणाची कामे करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
--------------
चांदवड येथील महावितरणचे सहाय्यक अभियंता चौधरी यांनी पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेची माहिती दिली. घराच्या छतावर सौरऊर्जा प्रकल्प बसवून वीजबिलात बचत करण्याची संधी या योजनेतून उपलब्ध आहे. एक किलोवॅटसाठी ३० हजार रुपये, दोन किलोवॅटसाठी ६० हजार रुपये, तर तीन किलोवॅट किंवा त्यापुढील क्षमतेसाठी कमाल ७८ हजार रुपयांपर्यंत केंद्र शासनाचे अनुदान मिळू शकते. इच्छुक नागरिकांनी अधिकृत पोर्टलवर नोंदणी करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
सरपंच डॉ. स्वाती देवरे, डॉ. भाऊराव देवरे, उपसरपंच शोभा पिंपळे, ग्रामपंचायत सदस्य हनुमान दखणे, प्रवीण बोडके, कांतीलाल निकम, दत्तू सोनवणे, शशिकांत गवारे बाळासाहेब मावळे, सरपंच प्रवीण आहेर, डोणगावचे सरपंच गोकूळ वाघ, निमोण ग्रामपंचायत अधिकारी दीपक काकडे, ग्रामपंचायत अधिकारी ढिकले आदींसह व बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.
-------------
१६-२ चौकट
एक एकरामागे एक जलतारा
महाराष्ट्र शासनाच्या मनरेगा योजनेअंतर्गत जलतारा प्रकल्पाला प्रोत्साहन देण्यात आले आहे. शासनाच्या नियोजनानुसार प्रत्येक एकर क्षेत्रामागे एक जलतारा तयार करण्याची संकल्पना असून, ग्रामपंचायतीने दरवर्षी किमान ५० जलताऱ्यांची कामे हाती घेण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. या कामांमुळे पावसाचे पाणी शेतातच मुरण्यास मदत होऊन जलसंधारणासोबत ग्रामीण भागात रोजगारनिर्मितीलाही चालना मिळू शकते.
----------