टुडे एक, मेन फिचर
---
NSK26H35015
----
जळगावच्या हवाई सेवेला दिवाळीची झळाळी
१३ दिवसांत ५,७७८ प्रवाशांनी केला विमान प्रवास; सुट्टीत पर्यटनाला पसंती
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १४ : दिवाळीचा सण, त्यानिमित्ताने मिळालेल्या सुट्या आणि पर्यटनासाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांमुळे जळगाव विमानतळावरील प्रवासी संख्येत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. विमान प्रवासाला मिळणारी पसंती आणि उपलब्ध विमानसेवांमुळे जळगावहून विविध शहरांकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या समाधानकारक आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या १३ दिवसांत तब्बल ५ हजार ७७८ प्रवाशांनी जळगाव विमानतळावरून प्रवास केला आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळात विमानसेवेला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे.
जळगाव विमानतळ प्राधिकरणाकडून मिळालेल्या माहितीनुसार १ ते १३ नोव्हेंबर या १३ दिवसाच्या कालावधीत एकूण १०६ विमानांची ये-जा झाली. यामध्ये ५३ विमानांचे आगमन, तर ५३ विमानांचे प्रस्थान झाले. या विमानांमधून तब्बल ५ हजार ७७८ इतक्या प्रवाशांनी हवाई सफर केल्याचे दिसून आले. यात पुणे, मुंबई, हैदराबाद तसेच अहमदाबाद येथून दिवाळी सण साजरा करण्यासाठी प्रवाशांची संख्या दिसून आली. तर गोवा येथे दिवाळीच्या सुट्टीत पर्यटनासाठी जाणाऱ्या प्रवाशांची संंख्या बऱ्यापैकी होती.
पाच मार्गावर विमानसेवा
सध्या जळगाव विमानतळावरून पुणे, गोवा, हैदराबाद, मुंबई आणि अहमदाबाद या पाच शहरांसाठी विमानसेवा उपलब्ध आहे. दोन विमान कंपन्यांकडून या मार्गांवर सेवा चालविली जात आहे. त्यामुळे खानदेशातील प्रवाशांना महत्त्वाच्या शहरांशी हवाई मार्गाने जोडले जाण्याची सुविधा मिळत आहे.
चौकट
रेल्वे, खासगी ट्रॅव्हलपेक्षा जलद प्रवास
दिवाळीच्या काळात नातेवाइकांकडे जाणारे नागरिक, पर्यटनासाठी बाहेर पडणारे कुटुंबीय तसेच व्यावसायिक प्रवाशांकडून विमान प्रवासाला पसंती दिली जात आहे. रेल्वे आणि रस्ते प्रवासाच्या तुलनेत कमी वेळेत इच्छित स्थळी पोहोचण्याची सुविधा असल्याने विमानसेवेचा पर्याय अधिक सोयीचा ठरत आहे. सणासुदीच्या हंगामातील प्रवासी संख्या पाहता जळगाव विमानतळावरील हवाई वाहतुकीला चांगली चालना मिळत असल्याचे दिसून आले.
(ग्राफ)
जळगाव विमानतळावरील आकडेवारी अशी
- कालवधी १ ते १३ नोव्हेंबर
- प्रवासी आगमन... ३,११३
- प्रवासी प्रस्थान.... २,६६५
- एकूण प्रवासी संख्या...५,७७८
----
विमानांची स्थिती......संख्या
आगमन........५३
प्रस्थान...... ५३
एकूण...... १०६