NSK26H34357
जळगाव : दरोडेखोरांकडून जप्त केलेला कोट्यवधी रुपयांचा ऐवज.
---
भोकर बँक दरोडा प्रकरण (लोगो)
------------------
दरोडेखोरांनी मोडले देशातील सर्व रेकॉर्ड
-----
सर्वांधिक सोने तारण असलेली भोकर शाखेची निवड; कारागृहात आखला कट
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. २ : जिल्ह्यात सोने तारण ठेवण्याच्या प्रमाणात स्टेट बँक ऑफ इंडियाची भोकर शाखा दुसऱ्या क्रमांकावर आहे. शेतीसाठी-शेतकरी मोठ्या प्रमाणात सोने तारण ठेवत असल्याची माहिती मिळवून बडतर्फ पोलिस उपनिरीक्षक शंकर जासक याने दरोड्याचा कट आखल्याचे चौकशीत समोर आले. लुटीनंतर चौघेही मुंबईच्या दिशेने पळून जाणार होते. देशात आजवर पडलेल्या दरोड्यात २७ किलो सोन्याची लूट व संपूर्ण मुद्देमाल जप्तीची एकमेव घटना असल्याचे बँकेच्या वरिष्ठांनी पोलिसांसोबत चर्चेत उलगडा केला.
स्टेट बँकेच्या भोकर (ता. जळगाव) शाखेत शनिवारी (ता. ३१) चार सशस्त्र दरोडेखोरांनी सुमारे २७ किलो सोने व १२ लाख २६ हजार ५०० रुपयांची रोकड लुटून पोबारा केला होता.
लूट करून पळालेले अंकुश तुळशीराम पवार-चव्हाण (वय २५, रा. खापरखेडा, जि. बऱ्हाणपूर, मध्य प्रदेश), अंकुश श्रावण चव्हाण (३०, रामदेववाडी, ता. जळगाव), गजानन राजेंद्र पवार (३२, न्यायडोंगरी, ता. नांदगाव) व शंकर रमेश जासक (४२, मन्यारखेडा, ता. जळगाव) यांचा समावेश आहे. चौघांची चौकशी व तपासावर पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर अधीक्षक संदीप गावित, उपअधीक्षक नितीन गणापुरे लक्ष ठेवून आहेत.
बँकेच्या माहितीचे संकलन
चौकशीत बँक व्यवहारांविषयी दरोडेखोरांनी माहिती घेतल्याचे समोर आले. कोणत्या शाखेकडे सर्वाधिक सोने असते, याची माहिती काढल्यानंतर भोकर शाखा जिल्ह्यात दुसऱ्या क्रमांकावर असल्याचे समजले. ग्रामीण भाग असल्याने तिकडे फारसे कोणाचे लक्ष राहणार नाही, या उद्देशाने शनिवारचा दिवस निवडून ही लूट करण्यात आली.
सर्वांचा समान हिस्सा
मुंबईला मुद्देमालाची समान चार भागांत विल्हेवाट लावणे सोयीचे होईल, यादृष्टीने त्यांनी नियोजन केले होते. बँकेतील लुटीनंतर दोन मिनिटे सायरन वाजला. मात्र, सायरन का वाजला हे सुरुवातीला कोणाला समजू शकले नव्हते. परिणामी, दरोडेखोर समोरून निघत असताना, ग्रामस्थ नुसतेच बघत राहिले.
पोलिसाचा मेंदू अन् अभ्यास
पोलिसांकडून कशा पद्धतीने तपास करतात, हे बडतर्फ उपनिरीक्षक शंकर जासकला माहित होते. पोलिसांना तांत्रिक पुरावा मिळू नये व आपल्यावर संशय येऊ नये, म्हणून दरोडा टाकताना चौघांनी स्वतःचे मोबाईल घरीच दडवून ठेवले होते.