जळगाव-भादली मार्गावर उद्या वेग चाचणी
रेल्वेरुळांपासून दूर राहण्याचे भुसावळ विभागाचे आवाहन
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १९ : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागांतर्गत जळगाव–भादली या ११.५१ किलोमीटर लांबीच्या पाचव्या रेल्वे मार्गाची बुधवारी (ता. २१) रेल्वे संरक्षा आयुक्तांकडून तपासणी करण्यात येणार आहे. या वेळी मार्गावर वेग चाचणी (स्पीड ट्रायल) घेतली जाणार असल्याने नागरिकांनी रेल्वे रुळांपासून सुरक्षित अंतर राखावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
पाचव्या रेल्वे मार्गाच्या कार्यान्वयनाच्या दृष्टीने ही तपासणी महत्त्वाची आहे. रेल्वे संरक्षा आयुक्त, मध्य सर्कल, मुंबई यांच्यामार्फत होणाऱ्या या तपासणीदरम्यान संबंधित मार्गावर रेल्वेगाड्यांची वेग चाचणी घेतली जाणार आहे. या वेळी गाड्या अधिक वेगाने धावण्याची शक्यता असल्याने रुळांजवळ जाणे धोकादायक ठरू शकते. या पार्श्वभूमीवर नागरिक, शेतकरी, शेतमजूर, मुले आणि तरुणांनी विशेष खबरदारी घ्यावी. रेल्वे रुळ ओलांडणे, रुळांच्या कडेला उभे राहणे किंवा रुळांजवळ विनाकारण जाणे टाळावे.
चौकट
सुरक्षित अंतर राखण्याचे आवाहन
विशेषतः रेल्वे मार्गालगत शेतीची कामे करणाऱ्यांनी सतर्क राहून सुरक्षित अंतर राखावे, असे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे पाचव्या रेल्वे मार्गाची तपासणी आणि वेग चाचणी सुरक्षितपणे पार पडण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातर्फे करण्यात आले आहे.