टुडे ४, मेन फिचर
---
(संबंधित संग्रहित छायाचित्र वापरावे)
----
लाचखोरीचा विळखा कायम; यंदा ३७ प्रकरणे उघड
गतवर्षी ४५ जणांवर कारवाई; यंदा ५० जणांना अटक, तक्रारदाराच्या घरीच पोहोचणार ‘एसीबी’
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ३१ : शासकीय कार्यालयात सर्वसामान्यांची कामे करून देण्यासाठी लाचेची मागणी होण्याचे प्रकार अद्याप थांबलेले नाहीत. भ्रष्टाचाराविरोधात कारवाई होत असतानाही जिल्ह्यात लाचखोरीचा आलेख कायम असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या आकडेवारीवरून दिसून येते. गतवर्षी जिल्ह्यात ४५ कारवाया करण्यात आल्या होत्या, तर चालू वर्षात आतापर्यंत ३७ प्रकरणे उघडकीस आली असून, ५० जणांना अटक करण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये भ्रष्टाचाराविरोधात जागरूकता निर्माण करण्यासाठी २६ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबरदरम्यान दक्षता जनजागृती सप्ताह राबविण्यात येत आहे. लाचेची मागणी झाल्यास नागरिकांनी जळगाव येथील कार्यालयात येण्याची आवश्यकता नसून, तक्रारदाराच्या ठिकाणीच विभागाचे पथक पोहोचणार आहे. तसेच लाचेपोटी दिलेली रक्कमही नियमानुसार १५ ते २० दिवसांत धनादेशाद्वारे परत मिळू शकते.
तक्रारीसाठी पुढाकार आवश्यक
शासकीय दाखले, विविध परवानग्या, शासकीय योजनांचा लाभ, कार्यालयीन मंजुरी आदी कामांसाठी नागरिकांना शासकीय कार्यालयांमध्ये जावे लागते. अशा वेळी काही अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांकडून काम करून देण्यासाठी पैशांची मागणी केली जाते. काम अडवले जाईल, वारंवार कार्यालयात हेलपाटे मारावे लागतील किंवा तक्रार केल्यानंतर अडचणी निर्माण होतील, या भीतीने अनेक नागरिक तक्रार करण्याचे टाळतात.
गतवर्षी ४५ प्रकरणे
जिल्ह्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून लाचखोरीच्या प्रकरणांवर लक्ष ठेवून कारवाई केली जाते. गतवर्षी विभागाने ४५ कारवाया केल्या. चालू वर्षात आतापर्यंत ३७ प्रकरणे समोर आली असून, त्यामध्ये ५० जणांना अटक करण्यात आली आहे. लाच मागणाऱ्या शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांसह त्यांच्या वतीने लाचेची मागणी करणाऱ्या खासगी पंटरवरही कारवाई केली जाते.
तक्रारदाराच्या ठिकाणी पथक
लाचेची मागणी झाल्यानंतर तक्रार करण्यासाठी नागरिकांनी जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात प्रत्यक्ष येण्याची आवश्यकता नाही. नागरिकांनी संपर्क साधल्यानंतर विभागाचे पथक तक्रारदाराच्या ठिकाणी पोहोचून पुढील प्रक्रिया करेल. तक्रारदाराची माहिती गोपनीय ठेवण्याबाबत आवश्यक ती खबरदारी घेतली जाते.
जनजागृती सप्ताह
सत्यनिष्ठेच्या संस्कृतीच्या माध्यमातून राष्ट्रसमृद्धी ही दक्षता जनजागृती सप्ताहाची संकल्पना आहे. या सप्ताहादरम्यान नागरिकांना लाचखोरीचे दुष्परिणाम, भ्रष्टाचारविरोधी कायदेशीर तरतुदी आणि तक्रार करण्याच्या प्रक्रियेची माहिती दिली जात आहे.
चौकट
लाचेची रक्कम १५ ते २० दिवसांत परत
लाचखोरीच्या प्रकरणात नागरिकांना लाचेपोटी द्यावी लागलेली रक्कम परत मिळण्याचीही तरतूद आहे. संबंधित प्रकरणातील आवश्यक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लाचेची रक्कम साधारणतः १५ ते २० दिवसांत धनादेशाद्वारे तक्रारदाराला परत मिळू शकते. त्यामुळे पैसे परत मिळणार नाहीत किंवा तक्रार केल्याने आर्थिक नुकसान होईल, अशी भीती नागरिकांनी बाळगू नये.
चौकट
तक्रारीसाठी संपर्क
टोल फ्री क्रमांक : १०६४
संपर्क क्रमांक : ७५८८६६१०६४
दूरध्वनी : ०२५७-२२३५४७७
ई-मेल : dyspacbjalgaon@gmail.com
संकेतस्थळ : acbmaharashtra.gov.in
कोट
भ्रष्टाचारमुक्त समाजाच्या निर्मितीसाठी नागरिकांची जागरूकता महत्त्वाची आहे. शासकीय काम करून देण्यासाठी कोणताही अधिकारी किंवा कर्मचारी लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी घाबरून न जाता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा.
- योगेश ठाकूर, पोलिस उपअधीक्षक,
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव