संक्षिप्त पट्टा
जुन्या भांडणावरून
तरुणाला मारहाण
जळगाव : सुप्रीम कॉलनीतील पांढरे किरणा दुकानासमोर मंगळवारी (ता.१३) रात्री दहाला एका तरुणाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली. रिजवान शाह रफिक शाह, (वय २०) हा उभा असताना सोमन बच्चन बागडे व त्याचा साथीदार संदीप कालू राठोड या दोघांनी मागील भांडणाचे कारण उकरुन काढत रिजवान याला बेदम मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी दिली. जखमीच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किरण पाटील तपास करीत आहेत.
--------
रहदारीस अडथळा
विक्रेत्याविरुद्ध गुन्हा
जळगाव : शहरात मायादेवी मंदिराजवळ रस्त्यावर सार्वजनिक ठिकाणी नास्ता विक्रेत्याने गाडी लावून रहदारीस अडथळा निर्माण केला होता. याप्रकरणी दोन विक्रेत्यांवर पोलिस कर्मचारी चंद्रकांत पाटील यांच्या तक्रारीवरून रामानंदनगर पोलिस ठाण्यात सागर अरुण वाणी तसेच अनील रामकृष्ण पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस कर्मचारी योगेश पाटील तपास करीत आहेत.
-----
भरधाव वाहनाच्या
धडकेत दोघे जखमी
जळगाव : शिरसोली ते जळगाव रोडवर, जैन पेट्रोलपंपासमोर रविवारी (ता.११) सायंकाळी सहाच्या सुमारास साहिल बेग मन्सूर बेग (वय २३) व त्याचा मित्र आवेश आरीफ भिस्ती असे दोघे दुचाकीने (एमएच १९, ईडब्लू१९७६)ने जळगावच्या दिशेने येत होते. यावेळी मागून सुसाट येणारे वाहन धडकल्याने दोघे गंभीर जखमी झाले. जखमीच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास पोलिस कर्मचारी धनराज गुळवे तपास करीत आहेत.
------
दुचाकीच्या धडकेत
पादचारी जखमी
जळगाव : राष्ट्रीय महामार्गावर मेहरुणजवळील रिलायन्स पेट्रोल पंपासमोर रात्रीच्या सुमारास सुसाट दुचाकीस्वाराने प्रौढाला धडक दिल्याची घटना घडली. मेहरुण येथील रहिवासी मोहम्मद अनिस शेख इलाहिबक्श खाटीक (वय ६५) पायी जात असताना अजिंठा चौकाकडून ईच्छादेवीच्या दिशेने जाणाऱ्या मोटारसायकल (एमएच १९ ईयू ५३४४) चालकाने त्यांना मागून धडक दिली. या अपघातात जखमीचे दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले असून, त्यांना गंभीर दुखापत झाली आहे. जखमीचे भाऊ हारुन खाटीक यांनी दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस कर्मचारी गणेश वंजारी तपास करीत आहेत.
--------
दोन लाखांसाठी
पत्नीचा छळ
जळगाव : आव्हाणे (ता.जळगाव) येथील विवाहितेचा माहेरून दोन लाख रुपये आणावे, यासाठी पतीसह सासरच्या मंडळींकडून छळ सुरू आहे. पीडिता धनश्री ऊर्फ प्रज्ञा अनिल सैंदाने (वय ४५, रा.पवारवाडी चाळीसगाव) यांनी दिलेल्या तक्रारीवर पती विनायक ऊर्फ अनिल दगडू सैंदाणे, सासू-विद्युलता प्रभाकर मोरे, मावस सासू सुवर्णलता यांच्याविरुद्ध जळगाव तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस कर्मचारी श्रीकांत बदर तपास करीत आहेत.
------
विटनेर गावात
मद्यपींचा धिंगाणा
जळगाव : विटनेर येथील महादेव गल्लीत शरद विक्रम म्हस्के (वय ४५) कुटुंबीयांसह वास्तव्यास आहेत. मंगळवारी (ता१३) रात्री नऊच्या सुमारास घराजवळ बसलेले होते. गावातील समाधान पुंडलिक ठोंबरे हा दारुच्या नशेत तेथे आला. काहीएक कारण नसताना शिवीगाळ करत रस्त्यावर पडलेल्या विटा मारुन फेकल्याने शरद म्हस्के यांच्या डोक्यात व तोंडावर दुखापत झाली. जखमीच्या तक्रारीवरुन एमआयडीसी पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस कर्मचारी रमेश चौधरी तपास करीत आहेत.
--------
‘एमआयडीसी’तून
विवाहिता बेपत्ता
जळगाव : शहरातील सुप्रीम कॉलनी खुबा नगर येथील ३५ वर्षीय विवाहीता एमआयडीसीत कामाला गेली होती. येथील एका डिस्ट्रीब्युटरकडे तब्येत बरी नसल्याचे कारण सांगून रविवारी (ता.११) सायंकाळी आठला निघून गेली. ती अद्याप पर्यंत परत न आल्याने पती फिरोज हुसेन तडवी यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस कर्मचारी दीपक महाजन तपास करीत आहेत.