NSK26H32512
जळगाव : बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना देताना महापौर दीपमाला काळे.
......
बांधकाम विभागाच्या कामांना गती द्या
महापौराचे अधिकाऱ्यांना निर्देश; गतिरोधकांसह प्रभागांतील प्रलंबित कामे मार्गी लावा
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १५ : शहरातील प्रलंबित विकासकामे मार्गी लावण्यासह नागरिकांच्या तक्रारींचे तातडीने निराकरण करण्यासाठी महापौर दीपमाला काळे यांनी बांधकाम विभागाची बैठक घेतली. आयुक्तांमार्फत प्राप्त झालेल्या तातडीच्या कामांचे प्रस्ताव लवकर सादर करून त्यांची अंमलबजावणी सुरू करावी, असे स्पष्ट निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
महापालिकेत झालेल्या या बैठकीत शहरातील विकासकामांचा आढावा घेण्यात आला. प्रलंबित कामांमुळे नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन संबंधित प्रस्तावांवर तातडीने कार्यवाही करण्याची गरज महापौरांनी अधोरेखित केली. विविध प्रभागांतील नगरसेवकांनी सुचविलेली विकासकामेही प्रलंबित न ठेवता त्यांना गती देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. शहरातील अत्यावश्यक कामे प्राधान्याने पूर्ण करण्यासाठी विभागाने नियोजनबद्ध पद्धतीने काम करावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. बैठकीला शहर अभियंता आर. टी. पाटील यांच्यासह बांधकाम विभागातील संबंधित अभियंते आणि अधिकारी उपस्थित होते.
गतिरोधकांच्या कामांना प्राधान्य
शहरातील विविध रस्त्यांवर वाहनांचा वेग नियंत्रित करण्यासाठी गतिरोधक उभारण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. अपघातांचा धोका कमी करण्याच्या दृष्टीने आवश्यक ठिकाणी गतिरोधक उभारण्यासाठी वाहतूक पोलिसांची परवानगी तातडीने घ्यावी आणि पुढील कार्यवाही पूर्ण करावी, असे निर्देश महापौरांनी दिले.
चौकट
तक्रारींचे त्वरित निराकरण करा
रस्त्यांची दुरवस्था आणि बांधकाम विभागाशी संबंधित अन्य समस्यांबाबत नागरिकांकडून प्राप्त तक्रारींचीही बैठकीत चर्चा झाली. नागरिकांना वारंवार त्रास सहन करावा लागू नये, यासाठी तक्रारींची गांभीर्याने दखल घेऊन त्यांचे त्वरित निराकरण करावे, असे महापौरांनी स्पष्ट केले.