सेकंड मेन
टुडे पान एकसाठी
-----------
जिल्ह्यातील दहा शिक्षण संस्थांकडून माहिती देण्यास टाळाटाळ
---------
शालार्थ आयडी घाेटाळा; शिक्षणाधिकाऱ्यांचे गटशिक्षणाधिकाऱ्यांना पत्र
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. २ : बोगस शालार्थ आयडी घाेटाळ्यात वैयक्तीक मान्यता बनावट असल्याचे उघड झाल्यानंतर माध्यमिक शिक्षण विभागाकडून जिल्ह्यातील ६५० मान्यतांपैकी ५३० शिक्षकांच्या बाेगस मान्यता रद्द करण्याचे आदेश शिक्षण विभागाने काढले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील साडेचारशेच्या जवळपास मान्यता रद्दचे आदेश वितरित केले गेले आहेत. दरम्यान, या घोटाळ्यातील जिल्ह्यातील दहा शाळांचे कागदपत्रे अद्याप ‘एसआयटी’ला प्राप्त झाले नसल्याने या शाळांची माहिती देण्यासाठी पाच तालुक्यांतील गटशिक्षणाधिकाऱ्यांना माध्यमिक शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण यांनी पत्र काढले आहे.
एसआयटी पथकाकडून तपासणी
शालार्थ आयडी घोटाळा राज्यभरात गाजत आहेत. या घोटाळ्याची सर्वांत जास्त व्याप्ती ही जळगाव जिल्ह्यात आहे. यात आतापर्यंत जिल्ह्यातील पाच जणांना अटक झाली आहे, तर या प्रकरणात अजूनही ‘एसआयटी’च्या पथकाकडून संस्थांमध्ये तपासणी केली जात आहे. असे असले तरी काही संस्थांकडून माहिती देण्यास टाळाटाळ केली जात असल्याचे समोर आले आहे. यातच अमळनेर तालुक्यातील चार शाळा आहेत. प्रभारी शिक्षण उपसंचालक एम. यु. देवकर व विशेष तपास पथकाचे सहआयुक्त संदीप मिटके यांनी माध्यमिक शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण यांना याबाबत पत्रव्यवहार केला आहे.
जिल्ह्यातील संबंधित दहा शाळांची २०१० ते २०२५ या कालावधीतील शिक्षण उपसंचालक कार्यालय नाशिक, शिक्षणाधिकारी, वेतन अधीक्षक, गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी यांच्याकडून झालेली तपासणी व तपासणी पूर्तता अहवाल सादर करण्याबाबत स्पष्ट केले आहे. ही माहिती अनेक वेळा मागवूनही देण्यात आली नसल्याचे विशेष पथकाने पत्रात म्हटले आहे. जिल्ह्यातील अमळनेर, एरंडाेल, चाळीसगाव, जळगाव, मुक्ताईनगर या पाच तालुक्यांतील या शाळांच्या कागदपत्रांची तपासणी करणे कागदपत्राअभावी अजून झालेले नाही.
पाच गटशिक्षणाधिकाऱ्यांना नाेटीसा
जिल्ह्यातील दहा शिक्षण संस्थांकडून माहिती दिली जात नसल्याने संस्थांकडील माहितीबाबत माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्याकडून पाच गटशिक्षणाधिकाऱ्यांना यांना नोटीसा देण्यात आल्या आहे. यात डी. आर. कन्याशाळा अमळनेर, शिवाजी हायस्कूल अमळनेर, जिजाऊ माध्यमिक विद्यालय भिलाली (ता.अमळनेर), प्रियदर्शनी विद्यालय एरंडोल, भारती माध्यमिक विद्यामंदिर कासोदा, सरस्वती माध्यमिक विद्यालय पाडसे (ता.अमळनेर), बेलगंगा तांत्रिक माध्यमिक विद्यालय, नूतन मराठा विद्यालय जळगाव, कै. अशोक फडके माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कुऱ्हा काकोडा, मिठाराम फकिरा तराळ विद्यालय अंतुर्ली (ता. मुक्ताईनगर), सर्वाेदय विद्यालय सिंधगव्हाण या शाळांची माहिती सादर करण्यासाठी पाच तालुक्यांतील गटशिक्षणाधिकाऱ्यांना नाेटीसा बजावण्यात आल्या आहेत.