टुडे एक : मेन फिचर
---
(संबंधित एआय चित्र वापरावे)
---
ऐन सणासुदीत विजेचा लपंडाव
सुमारे २० टक्के वीज भार वाढला; ‘इमर्जन्सी लोड रिलीफ’मुळे नागरिक त्रस्त
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १२ : ‘ऑक्टोबर हीट’मुळे तापमानाचा पारा ३५ अंशांच्या पुढे गेल्याने जळगाव शहरातील विजेची मागणी वाढली आहे. त्यातच अपुरी वीज वितरण यंत्रणा आणि वीज उपकेंद्रांवरील वाढता विद्युत भार यामुळे महावितरणला ‘इमर्जन्सी लोड रिलीफ’चा आधार घ्यावा लागत आहे. परिणामी, रात्री दहानंतर शहरातील विविध भागांत एक ते सव्वा तास वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागत आहे. आगामी दसरा आणि दिवाळीच्या सणोत्सवाच्या काळातही विजेची मागणी कायम राहिल्यास वीजपुरवठा खंडित होण्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागण्याची शक्यता आहे.
यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने उष्णतेची तीव्रता वाढली आहे. दिवसा उन्हाचे चटके आणि रात्री उकाडा जाणवत असल्याने घराघरांत पंखे, कूलर आणि वातानुकूलित यंत्रांचा वापर वाढला आहे. त्यामुळे शहरातील विजेच्या मागणीत सुमारे २० टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून मिळाली. वाढती मागणी आणि त्यासाठी आवश्यक असलेल्या यंत्रणेची मर्यादित क्षमता यामुळे वीजपुरवठा सुरळीत ठेवताना महावितरणसमोर आव्हान निर्माण झाले आहे.
उपकेंद्रांवरील भार वाढला
जळगाव शहरात सहा ते सात उपकेंद्रांच्या माध्यमातून रोहित्रांद्वारे नागरिकांना वीजपुरवठा केला जातो. या उपकेंद्रांवर पूर्वी सुमारे १७० केव्हीपर्यंत असलेला वीजभार गेल्या काही दिवसांत २२० केव्हीपर्यंत वाढल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. वाढत्या भारामुळे यंत्रणेवर ताण येत असून, संपूर्ण वीजपुरवठा यंत्रणा विस्कळित होऊ नये, यासाठी काही भागांचा वीजपुरवठा तात्पुरता बंद केला जात आहे.
चौकट
काय आहे ‘इमर्जन्सी लोड रिलीफ’?
उपकेंद्र किंवा वीज वितरण यंत्रणेवरील वाढता भार नियंत्रित ठेवण्यासाठी काही भागांचा वीजपुरवठा ठराविक काळासाठी बंद करून भार कमी केला जातो. त्यानंतर त्या भागातील पुरवठा पूर्ववत करून आवश्यकतेनुसार दुसऱ्या भागात ही प्रक्रिया केली जाते. यालाच आपत्कालीन भारमुक्ती (इमर्जन्सी लोड रिलिफ) म्हणतात. मात्र, या प्रक्रियेमुळे रात्रीच्या वेळी वीज खंडित होत असल्याने लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींना विशेष त्रास सहन करावा लागत आहे.
चौकट
शहराचा विस्तार; यंत्रणेवर ताण
नोव्हेंबर २०११ मध्ये महावितरणने क्रॉम्प्टन कंपनीसोबत केलेल्या करारानंतर संबंधित कंपनीने तीन वर्षे शहरातील वीजपुरवठ्याची जबाबदारी सांभाळली आणि यंत्रणा उभारली होती. त्यानंतर शहराचा विस्तार आणि ग्राहकसंख्या वाढत गेली; मात्र त्या तुलनेत वीज वितरण यंत्रणेचा विस्तार पुरेशा प्रमाणात झाला नसल्याचे चित्र आहे. गेल्या तीन ते चार महिन्यांपासून यंत्रणा वाढविण्याचे काम सुरू असले, तरी वाढती मागणी आणि मर्यादित क्षमता यामुळे उपकेंद्रांवरील भाराचा प्रश्न कायम आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळात नागरिकांना अखंडित वीजपुरवठा मिळणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
''महावितरण''चे ग्राहक संख्या
जळगाव शहर व ग्रामिण विभाग...................१ लाख ४४ हजार ७५७
उपकेंद्रांवरील वीज भार
उपकेंद्र.........................(वीज भार)
मेहरुण.............................२० मेगावॅट
रिंगरोड............................१० मेगावॅट
एमआयडीसी...................२० मेगावॅट
शिवाजीनगर....................२० मेगावॅट
गिरणा पपिंग....................१० मेगावॅट