जिल्हा परिषदेच्या २ अभियंत्यांना
१० हजारांची लाच घेताना अटक
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. २ : जिल्हा परिषदेच्या बांधकाम उपविभागातील रस्ता काँक्रिटीकरणाच्या बिलाच्या मंजुरीसाठी १५ हजारांची लाच मागितली. मात्र, तडजोडीअंती दहा हजारांची लाच स्वीकारणाऱ्या उपविभागीय अभियंता व कनिष्ठ अभियंत्याला जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सोमवारी (ता. २) मुद्देमालासह पकडले.
याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागात ठेकेदाराने लेखी तक्रार दिली होती. त्यांनी पिंपरी खुर्द (ता. धरणगाव) येथे २०२५-२०२६ मधील गाव अंतर्गत रस्ता काँक्रिटीकरणाचे एक लाख ९० हजार ७६३ रुपयांचे काम केले होते. या कामाची मोजणी पुस्तिका व बिल तयार करण्यासाठी कनिष्ठ अभियंता भागवत वसंतराव घवरे याने यापूर्वीच २० हजार रुपयांची लाच घेतली होती.
साडेनऊ टक्क्याचा दर
बिल मंजुरीसाठी तक्रारदार जिल्हा परिषदेच्या बांधकाम उपविभागात गेले असता, कनिष्ठ अभियंता घवरे याने बिलावर सही करून पुढे पाठविण्यासाठी व उपविभागीय अधिकारी सतीश मनसुलाल सिसोदिया (वय ५५) यांच्यासाठी एकूण बिलाच्या ९.५ टक्के दराने १५ हजार रुपयांची लाच मागितली.
पडताळणीनंतर कारवाई
सोमवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रारदाराने स्वतः येऊन तक्रार दिल्यानंतर उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या पथकाने पंचांसमक्ष तक्रारीची पडताळणी केली असता, संशयितांनी १५ हजारांची मागणी करून तडजोडीअंती नऊ टक्क्यांप्रमाणे १० हजारांची लाच स्वीकारण्यास संमती दर्शविल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर उपअधीक्षक ठाकूर, निरीक्षक रेश्मा अवतारे, बाळू मराठे, पोलिस नाईक संगीता पवार यांनी जिल्हा परिषदेच्या उपविभागीय अधिकारी कार्यालयात सापळा रचला. ठरल्याप्रमाणे कनिष्ठ अभियंता भागवत घवरे याने तक्रारदाराकडून दहा हजारांच्या लाचेची रक्कम स्वीकारून पंचांसमक्ष उपविभागीय अधिकारी सतीश सिसोदिया यांना दिली. त्यानंतर ती लाचेची रक्कम संशयित सिसोदिया यांच्याकडून पंचांसमक्ष जप्त करण्यात आली. या प्रकरणी जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. दोन्ही संशयितांना ताब्यात घेतले आहे.