जात प्रमाणपत्र रद्द होऊनही मूळ
दस्तऐवज जमा न करणे भोवले
जळगावात पिता-पुत्राविरुद्ध गुन्हा दाखल
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १० : उपविभागीय अधिकारी कार्यालयामार्फत अनुसूचित जमातीच्या जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या आदेशानुसार जात प्रमाणपत्र रद्द करून ते जप्त करण्यात आले होते. त्यानंतर ठरवून दिलेल्या मुदतीत मूळ जात प्रमाणपत्र उपविभागीय अधिकारी कार्यालयात जमा न केल्याप्रकरणी जळगाव शहर पोलिस ठाण्यात पिता-पुत्राविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव शहरातील शैलेंद्र काशिनाथ सपकाळे, राम शैलेंद्र सपकाळे, शैलेंद्र सपकाळे यांना उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयामार्फत टोकरेकोळी अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र निर्गमित करण्यात आली होती. या प्रमाणपत्रांची पळताळणी उपसंचालक (संशोधन) तथा सदस्य सचिव, अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती धुळे यांच्याकडे करण्यात आली. समितीच्या ३ सप्टेंबर २०२६च्या कार्यालयीन आदेशानुसार प्रमाणपत्र रद्द करण्यात आले. तसेच त्यांच्याकडील मूळ जातप्रमाणपत्र जप्त करण्यात आले. त्यानंतर संशयितांना मूळ दस्तऐवज जमा करण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. संशयितांनी विहित मुदतीत मूळ दस्तऐवज जमा न केल्याने संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
गुन्हा दाखल
तहसीलदार प्रशांत रामराव निंबोळकर (वय ५२) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास उपनिरीक्षक उल्हास चऱ्हाटे करीत आहेत.