NSK26H34338 व NSK26H34337
जळगाव : तळघरात फटाक्यांचे अनधिकृतपणे साठवणूक व सुरक्षेची कोणतीय यंत्रणा नसल्याने फटाके व्यावसायिकाला जाब विचारताना उपमहापौर मनोज चौधरी. दुसऱ्या छायाचित्रात व्यावसायिकांनी तळघरात लपवून ठेलेले फटाके.
---------
फटाक्यांची दुकाने की आगीचे सापळे?
-----
सुरक्षेचे नियम धाब्यावर; तळघरात साठा, परवान्यांचा पत्ताच नाही
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता.२ : दिवाळीत फटाक्यांच्या आतषबाजीने आनंद साजरा करण्याची तयारी सुरू असताना जळगावच्या बाजारपेठेत मात्र, फटाक्यांची दुकानेच नागरिकांच्या जीवितासाठी धोकादायक ठरत असल्याचे चित्र समोर आले आहे. बोहरा गल्ली, भवानी पेठ व चित्रा टॉकीज चौक परिसरातील फटाक्यांच्या दुकानांची महापालिका प्रशासनाने केलेल्या पाहणीत सुरक्षेच्या नियमांचा अक्षरशः फज्जा उडाल्याचे उघड झाले.
शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या परिसरात फटाक्यांची विक्री व्यावयायिकांकडून महापालिकेची व अग्निनशमन विभागाची कोणतीही परवानगी न घेता केली जात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सायंकाळी पाचला उपमहापौर मनोज चौधरी, उपायुक्त पंकज गोसावी, अतिक्रमण निर्मूलन अधीक्षक संजय ठाकूर, अग्निशमन विभागाचे अधीक्षक अश्वजीत घरडे यांनी पाहणी केली.
अग्निसुरक्षा यंत्रणा नावालाच
उपमहापौर मनोज चौधरी व उपायुक्त पंकज गोसावी यांच्या उपस्थितीत अग्निशमन व अतिक्रमण विभागाच्या पथकाने या परिसरातील दुकानांची तपासणी केली. यावेळी काही विक्रेत्यांकडे आवश्यक परवाने नसल्याचे, तर काही ठिकाणी विनापरवानगी फटाक्यांची विक्री सुरू असल्याचे आढळले. दुकानांमधील अग्निसुरक्षेची स्थितीही समाधानकारक नव्हती. कुठे एक-दोन अग्निशमन सिलिंडर, तर कुठे केवळ मोजक्या पाण्याच्या बादल्या ठेवल्या होत्या. फटाक्यांचा मोठा साठा असताना आग विझविण्याची एवढीच तयारी म्हणजे दुर्घटनेला आमंत्रण देण्यासारखेच आहे.
बाहेर पडण्याचा मार्गही कठीण
दिवाळीत या परिसरात तीन ते चार दिवसांत सुमारे चार ते पाच लाख ग्राहकांची गर्दी असते. त्यात सुभाष चौक ते राजकमल टॉकीपर्यंत सुमारे ८ ते १० फटाके विक्रेत्यांच्या दुकानांची उपमहापौरांसह महापालिकेच्या अग्निशमन व अतिक्रमण निर्मूलन विभागाने पाहणी केली. यात दोन दुकानांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक फटाक्यांची संख्या, तळघरात व दुकानाच्या जवळच जून्या घरांमध्ये फटाक्यांचा केलेला साठा आढळून आला. त्यात आग लागल्यास ग्राहकांना व फटाके विक्रेत्यांचे दुकानांच्या वर राहत असलेल्या कुटूंबांना अरुंद जागेतून सुरक्षित बाहेर पडणेही कठीण अशी परिस्थिती दिसून आली.
पंचनामे करून कारवाई करा
फटाक्यांची विक्री करताना परवाने, सुरक्षित साठवणूक, विद्युत यंत्रणेची सुरक्षितता व पुरेशी अग्निशमन साधने नसल्याचे अनेक फटाके व्यावसायिकांच्या दुकानात आढळून आले. यावर उपमहापौरांनी व्यावसायिकांनी ग्राहकांच्या सुरक्षेचे कोणतीच उपायोजना केलेली नसल्याचे दिसून आल्याने तीव्र संताप व्यक्त केला. संबंधित व्यावसायिकांचे परवानग्यासह किती फटाक्यांची साठवणूकीची क्षमता आदी गोष्टी तपासून कारवाई करण्याच्या सूचना उपमहापौर चौधरी यांनी केल्या.