मेन फिचर ( या बातमीला तीन फोटो येणार आहेत. एक मोठा फोटो व दोन दोन -दोन कॉलमचे फोटो अशी जागा सोडावी)
---
खरवडलेला महामार्ग ठरतोय धोकादायक
उपशीर्षक
यंत्रणेचे अक्षम्य दुर्लक्ष; शहरात सहा महिन्यांपासून काम रखडले, अपघातांत वाढ
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. २६ : शहरातून जाणाऱ्या महामार्गाच्या मजबुतीकरणाचे काम सहा महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आले. त्यासाठी महामार्ग खरवडून (स्क्रॅपिंग) ठेवला आहे. या खरवडलेल्या महामार्गावरुन वाहने घसरुन अपघात होण्याचा धाका वाढला असून, त्यामुळे गेल्या दोन महिन्यांत तिघा- चौघांचा बळी गेला आहे. महामार्ग उकरून ठेवलेला असताना त्यावरील कॉंक्रिटीकरणाचे काम करण्याआधी सेवारस्त्यांचे काम केले जात असून प्रत्यक्ष महामार्गाचे काम करायचे नव्हते तर हा महामार्ग खोदून का ठेवला? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
जळगाव शहरातून जाणाऱ्या महामार्गावर खोटेनगर ते कालिंका माता मंदिर या सुमारे सात किलोमीटर टप्प्याचे चौपदरीकरण २०२२ मध्ये करण्यात आले. विस्तृत प्रकल्प अहवाल तयार करण्यापासूनच या चौपदरीकरणाच्या कामात अनेक तांत्रिक त्रुटी राहिल्या. कामाचा दर्जाही निकृष्ट होता. म्हणूनच हा मार्ग तयार झाल्यानंतर वर्षभरातच या रस्त्याची वाट लागली. आणि रस्त्याच्या कामाचा दोष दायित्व कालावधी मे २०२७ असताना त्याआधीच त्याच्या नव्याने मजबुतीकरण करण्याची वेळ आली.
मजबुतीकरणही नियोजनशून्य
या रस्त्याच्या मजबुतीकरणाच्या कामात मुख्य महामार्गासह सेवारस्त्यांवर ‘व्हाइट टॉपिंग’चा (कॉंक्रिटीकरण) समावेश आहे. त्यानुसार सहा महिन्यांपूर्वीच या कामाचे कार्यादेश देण्यात आले. कालिंका माता मंदिरापासून काम सुरुही करण्यात आले.
मात्र, हे काम सुरू करत असताना कुठलेही नियोजन करण्यात आले नाही. महामार्गावरून जाणाऱ्या वाहतुकीचे नियमन करण्याच्या दृष्टीने कोणतीही उपाययोजना करण्यात आली नाही.
संपूर्ण महामार्गच उकरून ठेवला
‘व्हाइट टॉपिंग’ करत असताना मजबुतीसाठी आधीचा डांबरी मार्ग खरवडावा लागतो. म्हणजेच त्यावर स्क्रॅपिंगद्वारे खाचे पाडावे लागतात. नियोजनशून्य कारभाराचा नमुना याच ठिकाणी दिसून येतो. जेवढ्या भागात काम करायचे, तेवढ्याच रस्त्याचा भाग उकरणे अपेक्षित असताना सुरवातीलाच कालिंका माता मंदिर ते खोटेनगरपर्यंतचा संपूर्ण महामार्गच उकरुन ठेवण्यात आला. महामार्गावर दुतर्फा खाचे पाडण्यात आले असून त्यामुळे वाहने घसरुन पडण्याचा व मोठे अपघात होण्याचा धोका वाढला आहे. असे लहान-मोठे अपघात दररोजच घडत असतात. या मार्गावर गेल्या दोन महिन्यात दुचाकी घसरुन दोघा- तिघांचा बळीही गेला आहे.
सेवारस्त्यांच्या कामावर भर
एकीकडे महामार्ग उकरुन ठेवलेला असताना त्याला लागून असलेल्या सेवारस्त्यांच्या कामावर कंत्राटदाराने भर दिला आहे. खरेतर पहिल्या टप्प्यात महामार्गाचेच काम करणे अपेक्षित होते. त्यातही पाळधी- तरसोद वळण रस्त्यावर (बायपास) आसोद्याजवळील रेल्वे उड्डाणपुलाचा भाग पावसामुळे खचल्यानंतर हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असून वाहतूक शहरातून वळविण्यात आल्याने उकरुन ठेवलेल्या शहरातील महामार्गावर अवजड वाहनांचा ताण वाढला आहे.
----
(चौकट)
वर्षभराची मुदत, काम कधी होणार?
शहरातील महामार्गाच्या मजबुतीकरणासाठी संबंधित कंत्राटदारास वर्षभराची मुदत देण्यात आली असून त्यामुळे हे काम संथगतीने सुरू आहे. पावसाळ्याच्या नावाखाली काम बंद ठेवण्यात आले होते, ते पुन्हा सुरु करण्यात आले आहे. जोडीला बांभोरीजवळील सध्याच्या पुलाला समांतर पूलही उभारण्यात येत आहे. वर्षभर मुदत असली तरी सध्याची गती पाहता हे काम कधी पूर्ण होणार? असा प्रश्न आहे.
--------
(चौकट)
काम सुरू; पण यंत्रणेचे दुर्लक्ष
महामार्गाचे चौपदरीकरण झाल्यानंतर वर्षभरात झालेली दुरवस्था, महामार्गावरील तुटलेले सर्कल, महामार्गालगतचे अतिक्रमण धोकादायक ठरत असताना त्याकडे संबंधित यंत्रणांचे साफ दुर्लक्ष आहे. आता मजबुतीकरणाचे काम हाती घेण्यात आले असले तरी, त्याकडेही लक्ष द्यायला यंत्रणेला वेळ नाही, अशी स्थिती आहे.
--------
कोट..
शहरातील महामार्गाच्या मजबुतीकरणाचे काम सध्या सुरु असून कंत्राटदाराने कामाला गती दिली आहे. कामाची मुदत वर्षभराची असली तरी ते दोन महिन्यांत पूर्ण करण्यात येईल, त्यादृष्टीने नियोजन व प्रयत्न केले जात आहेत. कामाचा दर्जा चांगला राखला जाईल, त्याकडेही आमचे लक्ष आहे.
- बी.एस. साळुंखे
प्रकल्प संचालक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण
--------------