NSK26H32733
जळगाव : महापौरांच्या सूचनेनंतर या जागेवरील निघालेले अतिक्रमण.
.........
अखेर कानळदा रस्त्यावरील
अतिक्रमित पत्र्याचे शेड काढले
महापौरांच्या सूचनेनंतर कारवाई; परिसराची स्वच्छता
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १६ : महापौर स्वच्छता संकल्प अभियानांतर्गत सुरू असलेल्या पाहणीमुळे कानळदा रस्त्यावरील लक्ष्मीनगर परिसरातील महापालिकेच्या मोकळ्या जागेचा प्रश्न मार्गी लागला आहे. साईबाबा मंदिराजवळील जागेवर उभारण्यात आलेले पत्र्याचे शेड आणि तेथे साठविलेले भंगार साहित्य संबंधित व्यक्तीने स्वतःहून हटविले. त्यानंतर महापालिकेच्या आरोग्य विभागाने परिसराची स्वच्छता केली.
महापौर दीपमाला काळे यांनी गुरुवारी (ता. १५) प्रभाग क्रमांक एकमधील स्वच्छता व्यवस्थेची पाहणी केली. या वेळी कानळदा रस्त्यावरील लक्ष्मीनगर परिसरातील महापालिकेच्या मोकळ्या जागेवर पत्र्याचे शेड उभारून भंगार साहित्य ठेवण्यात आल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या जागेच्या परिसरात कचरा टाकला जात असल्याने अस्वच्छतेची समस्या निर्माण झाली होती. या प्रकाराची दखल घेत महापौरांनी संबंधित व्यक्तीला जागा रिकामी करण्याच्या सूचना दिल्या. तसेच अतिक्रमण न हटविल्यास महापालिकेमार्फत कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट केले. त्यानंतर शुक्रवारी संबंधित व्यक्तीने स्वतःहून पत्र्याचे शेड आणि भंगार साहित्य हटवून जागा मोकळी केली. जागा रिकामी झाल्यानंतर महापालिकेच्या आरोग्य विभागाने कर्मचारी व वाहनांच्या मदतीने परिसरातील कचरा हटवून स्वच्छता केली. सार्वजनिक जागा स्वच्छ ठेवण्यासाठी नागरिकांनीही सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी महापालिका प्रशासनाने केले.