NSK26H33958
जळगाव : प्रभाग १२ मध्ये रस्त्यांची पाहणी करताना महापौर दीपमाला काळे मनपाचे अभियंता.
....
बंद पथदिव्यांची रात्री तपासणी करा
महापौरांची प्रभाग १२ पाहणी; अनधिकृत बांधकामावर कारवाईचे निर्देश
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. २९ : ‘महापौर स्वच्छता संकल्प अभियाना’ अंतर्गत महापौर दीपमाला काळे यांनी गुरुवारी (ता. २९) प्रभाग क्रमांक १२ मधील विविध भागांची पाहणी केली. अनेक ठिकाणी कचरा साचलेला आढळल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. साचलेला कचरा तातडीने उचलण्यासह रात्रीच्या वेळी पथदिव्यांची तपासणी करून बंद दिवे दुरुस्त करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
प्रभागात बीव्हीजीची कचरा संकलन वाहने बंद असल्याने कचरा साचत असल्याचे निदर्शनास आले. यावर उपाय म्हणून डंपर, दोन जेसीबी आणि ट्रॅक्टरच्या मदतीने सायंकाळपर्यंत स्वच्छता पूर्ण करण्याच्या सूचना महापौरांनी दिल्या. महामार्गालगत शानबाग हॉलजवळील कचरा साचण्याचे ठिकाण तातडीने बंद करण्याचेही त्यांनी सांगितले. साने गुरुजी कॉलनीतील अनधिकृत बांधकामामुळे नागरिकांना त्रास होत असल्याची तक्रार यावेळी करण्यात आली. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश बांधकाम विभागाला देण्यात आले. प्रभागातील मोकळ्या भूखंडांवरील कचरा जेसीबीच्या सहाय्याने साफ करण्यासही सांगण्यात आले. या वेळी नगरसेवक नितीन बरडे, उज्ज्वला बेंडाळे, गायत्री राणे, अनिल अडकमोल यांच्यासह महापालिकेचे विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.