(आनंदराज आंबेडकर, रामदास आठवले, जोगेंद्र गवाडे यांचे संग्रहित छायाचित्र वापरावे)
----------------
जळगावात आज जनआक्रोश महामोर्चा
आनंदराज आंबेडकर, रामदास आठवले, जोगेंद्र कवाडेंची उपस्थिती
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता.३ : उपवर्गीकरण सत्तेचेच षडयंत्र हाणून पाडण्यासाठी शहरात रविवारी (ता.४) जनआक्रोश महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या महामोर्चास डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू रिपब्लिकन सेनाप्रमुख आनंदराज आंबेडकर, केंद्रीय समाज कल्याण राज्यमंत्री तथा ‘आरपीआय’ (आठवले गट)चे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जोगेंद्र कवाडे, चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी मंत्री बबनराव घोलप, भीमशक्तीचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी समाज कल्याणमंत्री चंद्रकांत हंडोरे, ऑल इंडिया दलित पॅंथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार उपस्थित राहणार आहेत. शुक्रवारी झालेल्या बैठकीत मुकुंद सपकाळे यांनी ही माहिती दिली.
भारतीय संविधानाच्या अनुषंगाने अनुसूचित जाती जमातींसाठी आरक्षणाच्या तरतुदी या संविधानिक स्वरूपात आहेत. धर्माधर्मांत व जातीजातींत तेढ निर्माण करून बेरोजगारी, महागाई, शिक्षण अशा सर्व पातळ्यांवर असणाऱ्या अनेक प्रश्नांकडून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी उपवर्गीकरणाचे षडयंत्र सत्तेचेच असून, हे आणून पाडण्यासाठी हा महामोर्चा निघणार आहे, असे बैठकीत सांगण्यात आले. यावेळी राजू मोरे, प्रमोद इंगळे, विजय घोरपडे, सतीश गायकवाड, गोविंदा पवार, जयसिंग वाघ, हरिशचंद्र सोनवणे, नीलू इंगळे, संध्या तायडे, आबा मोरे यांनी मोर्चा यशस्वी करण्यासाठी वेगवेगळ्या सूचना मांडून शांततापूर्ण वातावरणात मोर्चाचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले. प्रा. प्रीतीलाल पवार यांनी सूत्रसंचालन केले.
चौकट
...यांचाही राहणार सहभाग
रिपब्लिकन सेना, जनक्रांती मोर्चा, आरपीआय आठवले गट, राष्ट्रीय चर्मकार सेवा संघ, पीपल्स रिपब्लिकन पक्ष, भीमशक्ती, चर्मकार महासंघ, वंचित बहुजन आघाडी, भीम आर्मी, आझाद समाज पार्टी, भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल आदी अनेक संघटना उपवर्गीकरणाविरोधातील मोर्चात सहभागी होणार आहेत, असे या बैठकीत सांगण्यात आले.
------