शहर टुडे पान चारसाठी
---------------------
रथोत्सवापूर्वी रथमार्गावरील
खड्डे बुजविण्याला सुरुवात
--
प्रमुख मार्गांवर महापालिकेची दुरुस्ती मोहीम
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १६ : दीडशे वर्षांहून अधिक काळाची गौरवशाली परंपरा लाभलेल्या जळगावच्या ऐतिहासिक श्रीराम रथोत्सवाची तयारी सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर रथोत्सवाच्या मिरवणुकीत अडथळे निर्माण होऊ नयेत, यासाठी महापालिकेने रथमार्गावरील रस्त्यांच्या दुरुस्तीला प्राधान्य दिले आहे. रथाच्या मार्गावर अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडले असून, ते बुजविण्याच्या कामाला सोमवारी (ता.१६) सुरुवात करण्यात आली. जुने जळगाव, बोहरा गल्लीसह अन्य प्रमुख मार्गांवरील खड्डे बुजविण्यात येत आहेत.
संत आप्पा महाराज यांनी सुरू केलेल्या या ऐतिहासिक रथोत्सवाला दीडशे वर्षांहून अधिक काळाची परंपरा आहे. कार्तिक शुक्ल एकादशीला साजऱ्या होणाऱ्या या उत्सवात प्रभू श्रीरामाचा रथ व विविध वहनांची मिरवणूक काढली जाते. या सोहळ्यात हजारो भाविक सहभागी होतात. हिंदू-मुस्लिम ऐक्य व भक्तीचा संदेश देणाऱ्या या उत्सवात रथमार्गावरील रस्त्यांची स्थिती महत्त्वाची ठरते. अनेक ठिकाणी रस्त्यांवर मोठे खड्डे असल्याने रथाच्या मार्गक्रमणात अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिकेच्या बांधकाम विभागाने खड्डे बुजविण्याचे काम हाती घेतले आहे. शिवाय रथमार्गावरील अन्य महापालिकेकडून केल्या जाणाऱ्या सुविधादेखील व दुरुस्तीच्या कामाला सुरूवात केली आहे, अशी माहिती शहर अभियंता आर. टी. पाटील यांनी दिली.
रथमार्गावर स्वच्छता
रथोत्सवासाठी शहरातील स्वच्छतेवरही विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. मिरवणूक मार्गावरील कचरा उचलणे, रस्त्यांची स्वच्छता करणे, नाले व गटारी यांची सफाई, आवश्यक ठिकाणी जंतुनाशक फवारणी करण्याचे निर्देश उपमहापौरांनी संबंधित विभागांना दिले आहेत. भाविकांना मिरवणुकीदरम्यान कोणताही त्रास होऊ नये, यासाठी स्वच्छता व आवश्यक नागरी सुविधांची व्यवस्था करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.