NSK26H34168
जळगाव : किनगाव संचलन प्रकरणाच्या निषेधार्थ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या वतीने सागर पार्क ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पायी मोर्चा काढून निदर्शने करण्यात आली.
किनगाव घटनेप्रकरणी रिपाइंकडून निदर्शने
सागर पार्क ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ३१ : यावल तालुक्यातील किनगाव येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संचलनावरून निर्माण झालेल्या वादाचे पडसाद जळगाव शहरात उमटले. या प्रकरणाच्या निषेधार्थ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या वतीने सागर पार्क ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पायी मोर्चा काढण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करून घटनेचा निषेध करण्यात आला. महानगराध्यक्ष तथा नगरसेवक अनिल अडकमोल यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
समाजमाध्यमांवरील संबंधित पोस्टची सत्यता तपासून जाणीवपूर्वक खोटी माहिती पसरविणारे, संचलनात अडथळे आणणारे किंवा पोलिसांच्या कामात हस्तक्षेप करणारे दोषी आढळल्यास त्यांच्यावर कायद्यानुसार कारवाई करावी, अशी मागणी निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. गावातील शांतता, सामाजिक सलोखा आणि सर्व नागरिकांचा सन्मान अबाधित राहावा. चौकशी करताना कोणत्याही निरपराध व्यक्तीला त्रास होणार नाही, याची प्रशासनाने दक्षता घ्यावी, अशी अपेक्षाही निवेदनकर्त्यांनी व्यक्त केली आहे.