शालेय मनपा योग स्पर्धेत नियमबाह्य निवड
(उपशीर्षक)
डॉ. अनिता पाटील यांची क्रीडा आयुक्तांकडे तक्रार; अपात्र खेळाडूंनी बाद करण्याची मागणी
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ४ : जळगावात नुकत्याच झालेल्या शालेय मनपास्तरीय योगासन स्पर्धेत नियमबाह्य पद्धतीने खेळाडूंची निवड करण्यात आली. राज्य क्रीडा मार्गदर्शक चंचल माळी यांनी पदाचा दुरुपयोग करत नियमबाह्य निवड करण्यात आल्याचा आरोप जळगाव जिल्हा योग असोसिएशनच्या सचिव डॉ. अनिता पाटील यांनी केला असून डॉ. पाटील यांच्यासह पालकांनी याबाबत राज्याच्या क्रीडा आयुक्तांसह जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे.
जळगावातील छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुलात या योगासन स्पर्धा १ नोव्हेंबरला झाल्या. यात आर्टिस्टिक पेअर या क्रीडा प्रकारात एकाच शाळेच्या दोन खेळाडूंना सहभागी करून दुसऱ्या शाळेतील खेळाडूंसोबत स्पर्धा होणे अपेक्षित आहे. परंतु, दोन वेगवेगळ्या शाळांमधील खेळाडूंनी एकत्र सहभागी करून नियमबाह्य जोडी तयार केल्याचे डॉ. पाटील यांच्या तक्रारीत म्हटले आहे. तसेच १९ वर्षाखालील मुलींच्या वैयक्तिक प्रकारात निकाल जाहीर झाल्यानंतर चंचल माळी यांनी निकालात फेरबदल करून गुणतालिकेत प्रथम क्रमांकावर असलेल्या ध्रुवी बडाले या खेळाडूला डावलून स्वतःच्या कोचिंगमधील खेळाडूला विजयी घोषित केले. याबाबत पालक राहुल कोटेचा यांनी स्पर्धेच्या ठिकाणीच तक्रार केली होती. दरम्यान, चंचल माळी यांनी आपल्या पदाचा गैरवापर केला असून नियमबाह्य निवड रद्द करावी, अपात्र खेळाडूंना स्पर्धेतून बाद करावे. तसेच राज्य क्रीडा मार्गदर्शक चंचल माळी यांची विभागीय चौकशी करून त्यांची तात्काळ बदली करण्याची मागणी डॉ. अनिता पाटील यांनी केली आहे.
––