NSK26H32386
जळगावा : घनकचरा प्रकल्पाच्या पाहणीप्रसंगी महापौर दीपमाला काळे, उपमहापौर मनोज चौधरी, स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, उपायुक्त निर्मला गायकवाड, नगरसेविका जयश्री पाटील आदी अधिकारी.
----
घनकचरा प्रकल्पावरील आगीवरून महापौर संतप्त
कचरा जाळल्यास कठोर कारवाईचा इशारा; कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १४ : प्रभाग क्रमांक ९ मधील घनकचरा प्रकल्पावर वारंवार कचरा जाळण्याच्या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कचऱ्याच्या आगीतून निघणाऱ्या विषारी धुरामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याच्या तक्रारींची दखल घेत महापौर दीपमाला काळे यांनी बुधवारी (ता. १४) अधिकाऱ्यांसह घटनास्थळाची पाहणी केली. यापुढे डम्पिंग ग्राउंडवर कचरा जाळल्याचे आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा त्यांनी ठेकेदाराला दिला. तसेच अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश दिले.
घनकचरा प्रकल्पावरील कचऱ्याला वारंवार आग लागण्याचे प्रकार घडत असताना संबंधित यंत्रणेकडून प्रभावी उपाययोजना होत नसल्याबद्दल महापौरांनी नाराजी व्यक्त केली. कचरा जाळण्याचे प्रकार रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशा स्पष्ट सूचना त्यांनी ठेकेदार आणि संबंधित कर्मचाऱ्यांना दिल्या. घनकचरा प्रकल्पावरील प्लॅटफॉर्मचे काम अपूर्ण असून, पुण्यातील कंपनीकडून शेडचे कामही अद्याप पूर्ण झालेले नाही. यावरून महापौरांनी ठेकेदाराला धारेवर धरले. कंपाउंड वॉलसह इतर प्रलंबित कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. या पाहणी दौऱ्यात उपमहापौर मनोज चौधरी, स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, स्थानिक नगरसेविका जयश्री पाटील, उपायुक्त निर्मला गायकवाड, आरोग्य विभागप्रमुख समीर बोरोले आणि प्रकल्प अभियंता योगेश वाणी उपस्थित होते.
चौकट
उपमहापौरांचा आंदोलनाचा इशारा
घनकचरा प्रकल्पावरील कचऱ्याला लागणारी आग, त्यातून पसरणारा विषारी धूर आणि त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला निर्माण होणारा धोका याबाबत उपमहापौर मनोज चौधरी यांनीही तीव्र भूमिका घेतली. डम्पिंग ग्राउंडच्या कामकाजात संबंधित कंपनीकडून निष्क्रियता दिसून येत असून, प्रलंबित कामांबाबत प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेऊन केलेल्या उपाययोजनांचा लेखी अहवाल सादर करावा. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा चौधरी यांनी दिला.