मनपाची इमारत वापरावी
---
स्वच्छतेच्या मुद्द्यावर आयुक्तांकडून झाडाझडती
‘बीव्हीजी’सह आरोग्य विभागाला विचारला जाब; बायोमेट्रिक हजेरी, ऑनलाइन तक्रार यंत्रणा
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ५ : शहरातील स्वच्छतेचा बोजवारा उडालेला असताना आणि ठिकठिकाणी कचरा साचत असल्याच्या तक्रारी कायम असताना महापालिका प्रशासनाने आता आरोग्य विभाग आणि स्वच्छतेचा ठेका घेतलेल्या बीव्हीजी कंपनीला धारेवर धरले आहे. आयुक्त आदित्य जिवने यांनी सोमवारी आरोग्य विभागातील अधिकारी-कर्मचारी तसेच बीव्हीजी कंपनीच्या प्रतिनिधींची बैठक घेत स्वच्छतेच्या कामाचा आढावा घेतला. या वेळी स्वच्छता निरीक्षक, मुकादम आणि कंपनीच्या प्रतिनिधींची चांगलीच झाडाझडती घेत शहरातील स्वच्छतेबाबत जाब विचारण्यात आला.
शहरातील प्रत्येक भागाची स्वच्छता नियमित आणि प्रभावीपणे होणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात अनेक ठिकाणी कचरा उचलला जात नसल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर आयुक्तांनी स्वच्छता निरीक्षक आणि मुकादम यांच्या जबाबदाऱ्या जाणून घेतल्या. त्यांच्याकडे सोपविलेल्या क्षेत्रात स्वच्छता कशा पद्धतीने केली जाते, कर्मचाऱ्यांवर नियंत्रण कसे ठेवले जाते आणि कामाची देखरेख कशी होते, याची सविस्तर माहिती घेतली. केवळ जबाबदारी सोपवून चालणार नाही, तर प्रत्यक्ष कामावर लक्ष ठेवण्याचे यावेळी आयुक्तांनी सांगितले.
गैरहजर कर्मचाऱ्यांवर नजर
आरोग्य विभागातील काही कर्मचारी गैरहजर राहत असल्याच्या, तसेच कामावर उपस्थित असूनही अपेक्षित काम करीत नसल्याच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने हजेरीची यंत्रणा अधिक काटेकोर करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या महिन्यात आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांसाठी बायोमेट्रिक हजेरी यंत्रणा सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांची उपस्थिती आणि कामकाजावर नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे.
तक्रारींसाठी स्वतंत्र यंत्रणा
शहरातील स्वच्छतेबाबत नागरिकांकडून दररोज तक्रारी केल्या जातात. मात्र, या तक्रारींचा वेळेत निपटारा होणे आवश्यक आहे. त्यासाठी आरोग्य विभागाकडून स्वतंत्र ऑनलाइन यंत्रणा उभारण्यात येणार आहे. तक्रारींची नोंद, त्यावर केलेली कार्यवाही आणि निवारणाची स्थिती यावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.
चौकट
कचरा उचलण्यासाठी वाहनांची संख्या वाढवा
‘बीव्हीजी’ कंपनीकडून शहरातील उघड्या ठिकाणी साचलेला कचरा व्यवस्थित उचलला जात नसल्याबद्दल आयुक्तांनी नाराजी व्यक्त केली. कचरा पूर्णपणे उचलण्यासाठी ट्रॅक्टरची संख्या वाढविण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तसेच कचऱ्याच्या वजनानुसार पैसे देण्याऐवजी भाडेतत्त्वावर वाहने घेऊन कचरा उचलण्याचे काम करण्याबाबतही निर्देश दिले.