टुडे पान चार मेन फिचर
---
NSK26H33936
जळगाव : नवीन कचरा स्थलांतर केंद्राच्या लोकार्पणप्रसंगी पालकमंत्री गुलाबराव पाटील, खासदार स्मिता वाघ, आमदार सुरेश भोळे, महापौर दीपमाला काळे, उपमहापौर मनोज चौधरी, स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, आयुक्त आदित्य जीवने आदी.
---
आयटीआयजवळील कचरा रॅम्प अखेर बंद
नवीन कचरा स्थलांतर केंद्राचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. २९ : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या (आयटीआय) प्रवेशद्वाराजवळील कचरा संकलन रॅम्प स्थलांतरित करण्यात आला असून, मेहरूण परिसरातील जुन्या टीबी सेंटरच्या जागेवर उभारण्यात आलेल्या अद्ययावत कचरा स्थलांतर केंद्राचे (ट्रान्सफर स्टेशन) गुरुवारी (ता. २९) पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यामुळे परिसरातील विद्यार्थी आणि नागरिकांना कचऱ्यामुळे होणाऱ्या त्रासातून दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.
आयटीआयजवळील कचरा रॅम्पमुळे परिसरात दुर्गंधी आणि आरोग्याच्या समस्यांचा त्रास होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून केल्या जात होत्या. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनेही या प्रश्नावर आंदोलन केले होते. त्यावेळी महापौर दीपमाला काळे यांनी महिनाभरात रॅम्प स्थलांतरित करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार त्यांच्या पाठपुराव्यानंतर ‘स्वच्छ भारत अभियान (नागरी) २.०’ अंतर्गत मेहरूणमधील प्रभाग समिती कार्यालयाजवळील जुन्या टीबी सेंटरच्या जागेवर नवीन ट्रान्सफर स्टेशन उभारण्यात आले. त्यामुळे आयटीआय परिसरातील कचरा रॅम्पचा प्रश्न मार्गी लागला आहे. या लोकार्पणप्रसंगी खासदार स्मिता वाघ, आमदार सुरेश (राजूमामा) भोळे, महापौर दीपमाला काळे, उपमहापौर मनोज चौधरी, स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, आयुक्त आदित्य जीवने, अतिरिक्त आयुक्त शोभा बाविस्कर यांच्यासह पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.
स्वच्छता-रस्त्यांच्या कामांवर लक्ष द्या
यावेळी खासदार स्मिता वाघ म्हणाल्या, की आधुनिक कचरा स्थलांतर केंद्रामुळे उघड्यावरील कचऱ्याच्या तक्रारी येणार नाही. स्वच्छ व सुंदर जळगावसाठी महापालिकेने चांगले काम केले असून, उर्वरीत दोन कचरा स्थलांतर केंद्रांचे काम देखील लवकर पूर्ण करावे. जळगावात रेल्वे स्थानकावर आल्यावर स्थानकाच्या बाहेर पडताच कचऱ्याचे दर्शन होते, अनेक भागात रस्त्यांवर दिसतो. त्याकडे देखील लक्ष देण्याच्या सूचना महापालिका प्रशासनाला खासदार यांनी केल्या.
प्रशासकीय मान्यता मिळालेले कामे मार्गी लावा
दुष्काळामूळे शासनाकडून विविध कामांबाबत जीआर आलेले आहे. त्यामुळे विकास कामांना ब्रेक लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे निविदा प्रक्रिया झालेल्या तसेच प्रशासकीय मान्यता मिळालेल्या कामे तरी डीपीसीसह अन्य निधीतून कामे मार्गी लावावे अशी विनंती केली. तसेच शहरातील अनेक मुख्य रस्त्यांचे अपूर्ण कामे पूर्ण होण्यास मदत होईल असे मत आमदार भोळे यांनी पालकमंत्र्यांना केले.
मुख्यमंत्र्यांना साकडे घालणार
आमदार भोळे यांनी महापालिकेचा गाळेप्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्र्यासोबत चर्चा करण्याची विनंती पालकमंत्री पाटील यांना केली. पालकमंत्री पाटील यांनी भाषणातून शहराच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र यावे, याबाबत मंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत दोन दिवसांपूर्वी चर्चा झाली आहे. सर्वांनी मिळून मुख्यमंत्र्याची भेट घेऊन गाळेप्रश्न असो किंवा शहराच्या विकासकामांसाठी साकडे घालू, असे पालकमंत्री म्हणाले.
चौकट
निधीचे समान वाटप करा
पालकमंत्री पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून महापालिकेला निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली. शहरात आणखी कचरा संकलन केंद्रे उभारण्याबाबतही त्यांनी सकारात्मक भूमिका मांडली. तसेच महापालिकेतील समान निधी वाटप होत नसल्याच्या तक्रारी आमच्या पक्षातील काही पदाधिकारी तसेच भाजपमधील काही पदाधिकारी येऊन आमच्याकडे गाऱ्हाणे मांडतात, हे काही योग्य नाही. त्यामुळे सर्वांना समान निधी वाटप झाला पाहिजे. यातून महापालिकेचा कारभार कसा व्यवस्थित चालेल, असा खोचक टोला यावेळी पालकमंत्र्यांनी लगावला.
चौकट
कार्यक्रमाचा ऐनवेळी निरोप
कचरा स्थलांतर केंद्राचा लोकार्पण कार्यक्रमाचा महापालिका प्रशासनाकडून सकाळी दहाला मोबाईलवर मॅसेज पाठविण्यात आला. त्यामुळे दुपारी १२ वाजता असलेल्या कार्यक्रमाला येण्यासाठी काही नगरसेवकांची चांगलीच धावपळ उडाली. कार्यक्रम झाल्यानंतर अतिरिक्त आयुक्त तसेच उपायुक्तांना नगरसेविका वैशाली पाटील यांनी ऐनवेळी आलेला आमंत्रणाबाबत नाराजी व्यक्त केली.