मेन फिचर टुडे ३ :
NSK26H33296
जळगाव : गेंदालाल मिल भागात पडलेला कचरा.
--------------
NSK26H33297
शिवाजीनगर लाकूडपेठ भागात रस्त्याच्या बाजूला जमलेला कचरा.
------------
NSK26H33298
आर. आर. शाळेच्या मागील गल्लीत रस्त्याच्या बाजूला पडलेला कचरा.
---
शहरात कचऱ्याचे ‘ब्लॅक स्पॉट’; कारवाईची प्रतीक्षा
घाण, दुर्गंधी आणि अस्वच्छतेचा प्रश्न कायम; महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. २३ : शहरातील विविध भागांत निर्माण झालेल्या कचऱ्याच्या ब्लॅक स्पॉटचा प्रश्न कायम असून, या ठिकाणी नियमित स्वच्छता आणि कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई होण्याची गरज आहे. रस्त्याच्या कडेला, मोकळ्या जागांमध्ये तसेच नागरी वस्त्यांजवळ साचणाऱ्या कचऱ्यामुळे परिसरात अस्वच्छता आणि दुर्गंधी पसरत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत असून, महापालिकेने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
शहरातील गेंदालाल मिल परिसर, शिवाजीनगरातील लाकूडपेठेचा भाग, आार. आर. शाळेलगत, मानराज पार्कजवळील समांतर रस्त्यालगतचा परिसर, शाहूनगर खानदेश मिल कॉम्प्लेक्सचालगता परिसर यासह काही ठिकाणी कचरा साचत असल्याने ब्लॅक स्पॉटची समस्या कायम आहे. नियमित कचरा उचलला जात नसल्यास परिसरात अस्वच्छता वाढते. शहर स्वच्छ ठेवण्यासाठी कचरा संकलनाची नियमित व्यवस्था, ब्लॅक स्पॉटची वेळोवेळी स्वच्छता आणि नागरिकांमध्ये जनजागृती या बाबींवर भर देणे गरजेचे आहे. कचरा टाकण्यास प्रतिबंध असलेल्या ठिकाणी सूचना फलक लावणे तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर नियमानुसार दंडात्मक कारवाई करणे आवश्यक आहे. महापालिकेने या समस्येवर ठोस उपाययोजना करून शहरातील अस्वच्छता दूर करावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
नागरिकांमध्ये नाराजी
कचऱ्याची समस्या वारंवार उद्भवत असल्यास केवळ साफसफाई करून उपयोग नाही. कचरा टाकण्यावर नियंत्रण आणि संबंधितांवर नियमानुसार कारवाई होणे गरजेचे आहे. शहरातील कचऱ्याचे ब्लॅक स्पॉट शोधून त्यांची नियमित पाहणी करणे, स्वच्छता कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित करणे आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करणे आवश्यक आहे.
चौकट
दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त
शहरात अनेक भागांत कचरा साचलेल्या ठिकाणांहून येणाऱ्या दुर्गंधीचा परिसरातील रहिवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. कचऱ्यामुळे माशा, डास आणि इतर कीटकांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असून, नागरिकांच्या आरोग्याबाबत चिंता व्यक्त होत आहे. ब्लॅक स्पॉटवरील कचरा उचलण्याबरोबरच त्या ठिकाणी वारंवार कचरा साचू नये, यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना आवश्यक आहेत.