जळगाव जिल्हा बँक निवडणूक
(लोगो)
---
मुक्ताईनगरच्या जागेबाबत भाजप-शिवसेनेत वाद
---
केंद्रीय मंत्री खडसे विरुद्ध आमदार पाटील राजकारण पेटणार
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १४ : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष- शिवसेना- राष्ट्रवादी काँग्रेसची महायुती होणार, हे निश्चित झाले आहे. मुक्ताईनगर, चोपडा, बोदवडच्या जागांवर अजून निर्णय झालेला नाही. या जागांचा वाद दोन दिवसांत मिटेल. आम्ही महायुतीतर्फे २१ जागा लढविणार आहोत, अशी माहिती जलसंपदामंत्री गिरीश महाजन व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.
दरम्यान, मुक्ताईनगर तालुक्यात दोन जागा आहेत. मुक्ताईनगर व बोदवड या ठिकाणांवरून केंद्रीय मंत्री रक्षा खडसे, आमदार चंद्रकांत पाटील यांच्यात वाद पेटण्याची चिन्हे आहेत.
शुक्रवारी (ता. १३) रात्री उशिरापर्यंत जलसंपदामंत्री महाजन, पालकमंत्री पाटील, मंत्री संजय सावकारे, आमदार मंगेश चव्हाण, आमदार अनिल पाटील, खासदार स्मिता वाघ, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे आदींची बैठक झाली. तीत महायुतीतर्फे निवडणूक लढविण्याचा निर्णय झाला आहे. मुक्ताईनगरची जागा भाजपला सोडावी, अशी मागणी आहे. मात्र, त्याच जागेवर आमदार पाटील यांचाही दावा आहे. यात कोण माघार घेते, याकडे लक्ष लागून आहे. चोपडा, भडगाव, बोदवड येथील जागांबाबतही निर्णय बाकी आहे. दोन दिवसांत त्याबाबत निर्णय होऊन माघारीनंतर चित्र स्पष्ट होईल.
दरम्यान, पाचोरा मतदारसंघातील राजकीय समीकरणांना नवे वळण मिळाले आहे. आमदार किशोर पाटील यांचे पुत्र सुमीत पाटील यांचा उमेदवारी अर्ज छाननीत अवैध ठरविला होता. तो अर्ज आता अपिलात वैध ठरविण्यात आला. नाशिक विभागीय सहनिबंधकांनी सुनावणीनंतर हा निर्णय दिल्याने जिल्हा बँकेच्या निवडणुकीत पुन्हा चुरस निर्माण झाली आहे.
महाविकास आघाडीचे सात जागांवर उमेदवार
महाविकास आघाडीने सात ते आठ जागांवर उमेदवार उभे केले आहेत. कॉंग्रेसचे पदाधिकारी वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून निर्णय घेतील, अशी माहिती कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष जमील शेख यांनी दिली. महाविकास आघाडीतील इतर घटक सोबत येणार नसतील, तर काँग्रेस स्वतंत्र लढेल, असा इशारा देण्यात आला आहे.
माघारीसाठी केवळ दोन दिवस
आता १६ व १७ असे दोन दिवस माघारीसाठी आहेत. यात कोण माघार घेते, याकडे सहकार क्षेत्राचे लक्ष लागून आहे.