डॉक्टर दांपत्य ड्यूटीवर;
बंद घरावर चोरट्यांचा डल्ला
रोकडसह सव्वादोन लाखांचे दागिने लंपास
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ६ : शहरातील सुयोग कॉलनीत अवघ्या दोन तासांच्या कालावधीत बंद घराचे कडी-कोयंडे तोडून चोरट्याने २ लाख ३८ हजार रुपयांचे सोने-चांदीचे दागिने आणि रोकड लंपास केली. ही घटना सोमवारी (ता. ५) सकाळी पावणेअकरा ते पाऊणच्या दोन तासांत सुमारास घडली.
सुयोग कॉलनीतील (सेंट जोसेफ शाळेजवळ) साईकृपा रेसिडेन्सीमधील फ्लॅट नं. ९ येथे राहणाऱ्या डॉ. संपदा गोस्वामी (वय ५४) व त्यांचे पती डॉ.अजयगिरी गोस्वामी हे दोघेही डॉक्टर दाम्पत्य सोमवारी (ता.५) नेहमीप्रमाणे सकाळी साडेदहाला ड्यूटीवर होते.
कडी-कोयंडे तोडले
दुपारी पाऊणच्या सुमारास संपदा गोस्वामी घरी परत आल्या असता, त्यांना घराच्या दोन्ही मुख्य दरवाजांचे कडी-कोयंडे व कुलूप तुटलेले दिसले. घरात प्रवेश केला असता बेडरूममधील कपाट आणि शोकेसमधील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसून आले. चोरट्याने कपाटात ठेवलेले सोन्याचे व डायमंडचे दागिने तसेच रोख रक्कम चोरून नेल्याचे निष्पन्न झाले.
दोन तांसात चोरी
दिवसाढवळ्या अवघ्या दोन तासांत घडलेल्या या धाडसी घरफोडीमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. या प्रकरणी संपदा गोस्वामी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.