(जागेनुसार कापता येईल)
जळगाव जिल्ह्यातील केळी,
लिंबू उत्पादक मदतीच्या प्रतिक्षेत
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ३१ : जिल्ह्यात जळगाव, पाचोरा, भडगाव, एरंडोल, जामनेर तालुक्यांना उन्हाळ्यात अनेकदा तुफान वादळी-वाऱ्यासह पावसाने चांगलेच झोडपून काढले. या अवकाळी पावसामुळे शेतामधील उभी केळी तर आडवी झालीच शिवाय लिंबूसह मका, ज्वारी, गहू आदी उन्हाळी पिकांचे मोठे नुकसान झाले होते. नुकसानीचे पंचनामे झाले, परंतु भरपाई केव्हा मिळेल, असा मुद्दा शेतकरी उपस्थित करीत आहेत.
जानेवारी ते एप्रिल २०२६ या कालावधीत केळी व अन्य पिकांच्या नुकसानीबाबत शेतकऱ्यांची यादी जाहीर झाली आहे. नुकसान भरपाई मिळण्यासाठी आवश्यक विशिष्ट क्रमांक शेतकऱ्यांना मिळाले आहेत. या क्रमांकाच्या आधारे संबंधित पोर्टलवरून केवायसी केल्यानंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात नुकसानीचा निधी जमा होतो. पण ही केवायसीच होत नाही. केवायसाठी आवश्यक ओटीपी किंवा बोटांचे ठसे येत नाहीत. यामुळे हा नुकसानीचा मदतनिधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होत नसल्याची स्थिती आहे. पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश होते. यानंतर पंचनामे झाले. या झालेल्या नुकसानीची राज्य शासनाने दखल घेतली. पण नुकसानग्रस्त शेतकरी, पीडितांना आवश्यक सर्व ती मदत मिळालेली नाही, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.