NSK26H31477 : नवल सोनवणे
-----------
दुचाकीसह गटारीत कोसळून तरुणाचा मृत्यू
----
कंत्राटदाराच्या निष्काळीपणाचा बळी गेल्याचा कुटुंबीयांकडून आरोप
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ५ : मेहरुण भागातील छत्रपती शिवाजी उद्यान भागात रस्त्याच्या मधोमध असलेल्या उघड्या गटारीत दुचाकीसह कोसळल्याने नवल अर्जुन सोनवणे (वय ३७, रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव) याचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (ता. ५) दुपारी घडली. रस्त्याचे काम करणाऱ्या मक्तेदाराच्या हलगर्जीपणामुळेच बळी गेल्याचा आरोप नातेवाइकांनी केला.
सोनवणे चटई कंपनीत कामाला होते. सोमवारी दुपारी मेहरुणमधून काम आटोपून दुचाकीने घरी येत होते. छत्रपती शिवाजी उद्यान परिसरात नवीन रस्त्यावरून जाताना नवीन बांधलेल्या गटारीचे काम अपूर्ण होते. गटारीवर ढापाही टाकलेला नव्हता. सोनवणे यांना उघड्या गटारीचा अंदाज न आल्याने त्यांची दुचाकी थेट गटारीच्या ब्लॉकमध्ये जाऊन अडकली. यामुळे सोनवणे थेट डोक्यावर आदळले व गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. रस्ता व गटारीचे काम सुरू असताना, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कोणतीही काळजी घेतली नव्हती. उघड्या गटारीभोवती कोणतेही संरक्षण किंवा धोक्याची सूचना देणारा फलकही लावला नव्हता. गटारीवर सुरक्षेसाठी कल्व्हर्ट टाकले असते किंवा किमान सूचना फलक असता, तर सोनवणे यांचा जीव वाचला असता, असे नातेवाइकांनी सांगितले.
सोनवणे यांच्या मागे पत्नी, आई, मुलगा व मुलगी असा परिवार आहे. सोनवणे यांच्या आकस्मिक मृत्यूची बातमी समजताच नातेवाइकासंह परिचितांनी रुग्णालयात धाव घेतली. रामेश्वर कॉलनीतही या घटनेने शोककळा पसरली आहे.