टुडे १, मेन
----
(फोटोसाठी चार कॉलम जागा सोडावी)
---
जळगावातील पाहुण्यांचे अतिक्रमणाने स्वागत
उपशीर्षक
रेल्वेस्थानकासमोरील रस्ताच गिळला; हॉकर्स, रिक्षाचालकांची मनमानी
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ३ : रेल्वेस्थानक अन् बसस्थानकाचा परिसर खरेतर त्या- त्या शहरांच्या एकूणच शिस्त, स्वच्छता आणि वाहतुकीच्या नियमनाची ओळख देणारा भाग असतो. त्यातही जंक्शन रेल्वेस्थानक असेल तर त्या स्थानकाच्या ठिकाणी येणाऱ्या पाहुण्यांच्या मोठ्या अपेक्षा असतात. जळगावात येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत मात्र रेल्वेस्थानकासह बसस्थानकबाहेरील हॉकर्स, बेशिस्त वाहनतळ आणि मनमानी करणाऱ्या रिक्षाचालकांच्या बेशिस्त वर्तनाने होते. जळगाव शहराची बदनामी होत असून महापालिकेसह पोलिस यंत्रणेने त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
जळगाव.. केळी, कापूस या शेतीपिकांसह सुवर्णबाजारासाठी देशभरात प्रसिद्ध असलेले शहर, जिल्हा. कापड व्यवसाय, पीव्हीसी पाइप, डाळ उद्योगासह ठिबक नळ्या, चटई उद्योग याठिकाणी विस्तारलेले.. जैन इरिगेशनसारखी जगप्रसिद्ध कंपनीही याच शहरात.. त्यामुळे व्यावसायिक, पर्यटक, उद्योजकांचा वावर जळगावातून बऱ्यापैकी होत असतो.
पर्यटकांसाठी सोयीचे
जळगाव रेल्वेस्थानक मध्य रेल्वेमार्गावरील एक महत्त्वाचे जंक्शन.. जवळच २५ किलोमीटरवर भुसावळसारखे मोठे जंक्शन.. या दोन्ही रेल्वेस्थानकांवरुन देशातील चारही दिशांकडे रेल्वेने प्रवास करता येतो. देशभरातून हजारो प्रवासी या दोन्ही स्थानकांवरुन दररोज प्रवास करीत असतात. जळगाव पर्यटनाच्या दृष्टीने प्रसिद्ध नसले तरी, या शहरापासून प्रसिद्ध अजिंठा लेण्या अवघ्या ५० किलोमीटरवर, वेरुळच्या लेण्या १०० किलोमीटरवर आहेत. त्यामुळे देश- विदेशातील पर्यटक मोठ्या संख्येने जळगाव स्थानकावर उतरत असतात.
पाहुण्यांचा भ्रमनिरास
पर्यटक, व्यावसायिक, उद्योजक जळगावात नियमितपणे प्रवास करीत असतात. केंद्र सरकारच्या मेहेरबानीने गेल्या काही वर्षांत रेल्वेस्थानकांचा कायापालट झालांय, तो जळगाव स्थानकावरही दिसून येतो. पण, जळगावात येणाऱ्या पाहुण्यांचा रेल्वेस्थानकाबाहेर आल्यानंतर भ्रमनिरास होतो.
स्थानकासमोरील रस्तेच गिळले
स्थानकाला लागून असलेल्या आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर रस्त्याच्या दुतर्फा खाद्यपदार्थांचे स्टॉल्स, हॉकर्सचा ठिय्या रात्रंदिवस असतो. स्थानकासमोरील रस्ता १०० फुटी असल्याचे दिसते, मात्र दोन्ही बाजूला रस्त्याच्या मध्यापर्यंत अतिक्रमणाचा विळखा आहे. रस्त्याच्या मधोमध रिक्षाथांबा आहे. मात्र, बहुतांश रिक्षा रस्त्याच्या दुतर्फा बेशिस्तपणे लागलेल्या दिसतात. प्रवाशांना रिक्षात बसविण्यासाठी चालकांची बेशिस्त स्पर्धाच लागलेली असते. रस्त्याच्या मधोमध रिक्षा लावून चालक स्थानकाच्या परिसरात प्रवाशांना घेण्यासाठी गेलेले दिसतात. त्यामुळे रेल्वे स्थानकावर विविध कामासाठी येणाऱ्या वाहनधारकांची प्रचंड कोंडी होते.
पोलिस चौकी नावालाच
रेल्वेस्थानकासमोरील रस्त्यावरील अतिक्रमणाकडे महापालिका प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. दररोज याठिकाणचे अतिकम्रण वाढत असताना मनपा यंत्रणेची स्थानकाबाहेरील अतिक्रमणावर कारवाई झाल्याची नोंद नाही. स्थानकाबाहेरच दोनशे मीटरवर पोलिस चौकी आहे. पण, तीदेखील नावालाच. बऱ्याचदा पोलिस चौकीत पोलिस आढळून येत नाही. असले तरी, बेशिस्त रिक्षाचालकांना शिस्त लावण्याची त्यांची हिंमत नाही, अशी स्थिती आहे.
बसस्थानकाची तीच दशा
जळगावचे बसस्थानकही खरेतर रुंद रस्त्यावर आहे. समोरच वाहतूक पोलिस शाखेसह पोलिस अधीक्षकांचे कार्यालय स्थित आहे. तरीही बसस्थानकाबाहेरील अतिक्रमणावर कधीही कारवाई होताना दिसत नाही. शिवाय, या ठिकाणी तर रिक्षाचालकांच्या बेशिस्त वर्तनाचा नमुना सातत्याने पाहायला मिळतो. पोलिस अधीक्षक कार्यालय व वाहतूक शाखेचे प्रवेशद्वार एकच आहे. त्याठिकाणी अनेकदा वाहतूक पोलिस तैनात असतात. पण, बेशिस्त रिक्षाचालक त्यांनाही जुमानत नाहीत. त्यामुळे बसस्थानकावर येणाऱ्या जळगावच्या पाहुण्यांचे स्वागतही अशाप्रकारे बेशिस्त रिक्षा व अतिक्रमणामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीने होते.
----------