गुटखा खाऊन पायावर
थुंकल्याने चाकूहल्ला
चार संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. २८ : गुटखा खाऊन पायावर थुंकल्यावरून झालेल्या वादातून एका तरुणावर चाकूने हल्ला चढवून चौघांनी लाथाबुक्क्यांनी तुडविल्याची घटना घडली. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील मेन रोडवरील सेलिब्रेशन दुकानासमोर सोमवारी (ता.२६) रात्री साडेनऊच्या सुमारास उभे असताना संशयिताने पायावर गुटखा थुंकल्याचा जाब विचारल्यावरून वाद होऊन चौघांनी राकेश समाधान कोळी (वय १८) याच्यावर चाकूने वार करून जखमी केल्याची घटना घडली.
निमखेडी शिवारातील केदारेश्वर महादेव मंदिराजवळ राकेश समाधान कोळी (वय १८) कुटुंबीयांसह वास्तव्यास आहे. सोमवारी (ता.२६) राकेश त्यांच्या मित्रांसह शहरातील सेलिब्रेशन दुकानाजवळ उभा होता त्या वेळी. आदित्य कोळी, अनिल एकनाथ नन्नवरे, भावेश समाधान सपकाळे, रोहित दत्तू राठोड (सर्व रा. निमखेडी, ता. व जि. जळगाव) यांच्यापैकी एकाने राकेशचा मित्र हर्षलच्या पायावर गुटखा खाऊन थुंकल्याचा जाब विचारल्यावरुन वाद घालत मारहाण केली. चौघांपैकी एकाने कंबरेतून चाकू काढून त्याच्यावर सपासप वार करून गंभीर जखमी केले. जखमीच्या तक्रारीवरुन शहर पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस कर्मचारी सुधीर साळवे तपास करीत आहेत.