बेपत्ता तरुणाचा मृतदेह
आढळला कुजलेल्या अवस्थेत
दुचाकीवरून पटली ओळख; अपघाती मृत्यूचा अंदाज
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १३ : गेल्या चार दिवसांपासून बेपत्ता असलेल्या गलू देविदास कोळी (वय ३८, रा. भोलाणे, ता. जळगाव) या तरुणाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह शुक्रवारी (ता. १३) जळगाव-भोलाणे रस्त्यावरील आसोदा शिवारातील एका शेतात आढळून आला. शेतकऱ्याच्या निदर्शनास ही घटना आल्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. दरम्यान, दुचाकीवरून मृतदेहाची ओळख पटली.
गलू कोळी हे सोमवारी (ता.९) जळगाव येथे आले होते. मात्र, त्यानंतर ते घरी परतले नाहीत. कुटुंबीयांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला; परंतु ते मिळून न आल्याने रामानंदनगर पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार देण्यात आली होती. त्यानुसार पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू होता. दरम्यान, शुक्रवारी जळगाव-भोलाणे रस्त्यावरील आसोदा शिवारातील एका शेतात कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. शेतकऱ्याने याबाबत तालुका पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गावातील नागरिकांच्या उपस्थितीत मृतदेहाजवळ असलेल्या दुचाकीवरून मृत व्यक्तीची ओळख गलू कोळी अशी पटली. दरम्यान, रामानंदनगर पोलिसांकडून बेपत्ता तरुणाचा शोध घेताना सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले होते. त्यात गलू कोळी यांनी आकाशवाणी चौकात एका व्यक्तीला सोडल्याचे दिसून आले. त्यानंतर ते भोलाणे रस्त्याने जात असल्याचेही फुटेजमध्ये स्पष्ट झाले होते.
चौकट
पोलिस तपास सुरू
गलू कोळी हे दुचाकीने घरी परतत असताना रस्त्यावरील वळणावर त्यांचे वाहन शेतात जाऊन पडले असावे आणि या अपघातात त्यांचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.