पिंप्राळ्यातून वृद्ध, मेहरुणचा प्रौढ,
रामेश्वर कॉलनीतून तरुणी बेपत्ता
अपहरणाचे तीन वेगवेगळे गुन्हे दाखल
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ३ : शहरातील विविध भागातून तीन जण बेपत्ता झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. या प्रकरणी अपहरणाचे तीन वेगवेगळे गुन्हे दाखल झाले आहेत.
हनुमान नगर (मेहरुण) येथून सचिन लक्ष्मण वंजारी (वय ४०) हे २९ सप्टेंबरला घरातून अचानक निघून गेले. पिंप्राळा गुरुदत्त नगरातील रहिवासी प्रमोदसिंग जयसिंग राजपूत (वय ६१) ३ सप्टेंबरला घरातून अचानक निघून गेले आहेत. तर रामेश्वर कॉलनी येथील १९ वर्षीय तरुणी बेपत्ता झाली आहे. कुटुंबीयांच्या शोधानंतरही संबांधितांचा शोध न लागल्याने त्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. हनुमान नगरातील प्रौढा प्रकरणी एमआयडीसी पोलिसांत अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस नाईक दीपक महाजन तपास करीत आहेत. पिंप्राळ्यातील ६१ वर्षीय वृद्ध प्रकरणी रामानंदनगर पोलिसांत अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सहायक फौजदार संगीता खांडरे करीत आहेत. तर १९ वर्षीय तरुणी बेपत्ता प्रकरणात दाखल अपहणाच्या गुन्ह्याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांत नोंद करण्यात आली असून तपास पोलिस कर्मचारी भारती देशमुख करत आहेत. तिन्ही गुन्ह्यातील बेपत्ता नागरिकांची माहिती मिळाल्यास संबंधित पोलिस ठाण्यात किंवा पोलिस मदत केंद्रास (डायल-११२)ला कळवावे, असे आवाहन पोलिस दलातर्फे करण्यात आले आहे.