टुडे पान ४, मेन फिचर
---
(निर्माणाधिन इमारतीचे संग्रहित चित्र वापरावे)
---
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ४०० बांधकामांना हिरवा कंदील
‘नगररचना’तील प्रलंबित फाइल्सचा आयुक्तांकडून निपटारा; ३० ले-आउटलाही मिळाली मंजुरी
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ४ : शहरातील बांधकाम परवानग्यांसाठी महापालिकेच्या नगररचना विभागात अनेक महिन्यांपासून रखडलेल्या प्रस्तावांना अखेर गती मिळाली आहे. महापालिका आयुक्तांनी प्रस्तावांची नियमांच्या आधारे छाननी करून तब्बल ४०० बांधकामांना मंजुरी दिली आहे. याशिवाय शहरातील ३० ले-आउटच्या प्रस्तावांनाही हिरवा कंदील दाखविण्यात आला आहे. एकाच वेळी मोठ्या संख्येने प्रस्ताव मार्गी लागल्याने बांधकाम क्षेत्रातील व्यावसायिक, भूखंडधारक आणि नागरिकांना दिलासा मिळाला आहे. विशेष म्हणजे, दिवाळीच्या काळात मिळालेल्या मंजुरीमुळे शहरातील बांधकाम व्यवसायाला चालना मिळण्याची शक्यता आहे.
शहरातील विविध भागांमध्ये असलेल्या खुल्या भूखंडांवर निवासी तसेच व्यावसायिक बांधकाम करण्यासाठी नागरिकांकडून महापालिकेच्या नगररचना विभागाकडे प्रस्ताव दाखल करण्यात आले होते. मात्र, या प्रस्तावांना वेळेत मंजुरी मिळत नसल्याने अनेक फाइल्स प्रलंबित होत्या. त्यामुळे बांधकाम सुरू करण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या भूखंडधारकांना अडचणींचा सामना करावा लागत होता. नगररचना विभागाकडून प्रस्ताव पुढील कार्यवाहीसाठी आयुक्तांकडे पाठविण्यात आले होते. मात्र, मंजुरीची प्रक्रिया रखडल्याने नागरिकांमध्ये नाराजी होती.
त्रुटींची पूर्तता करूनच मंजुरी
प्रलंबित प्रस्तावांचा निपटारा करताना आयुक्तांनी केवळ फाइल्स निकाली काढण्यावर भर न देता त्यांची नियमांनुसार तपासणी करण्याची भूमिका घेतली. नगररचना विभागाकडून प्राप्त झालेल्या प्रस्तावांमधील कागदपत्रे, तांत्रिक बाबी आणि नियमांची पडताळणी करण्यात आली. ज्या प्रस्तावांमध्ये त्रुटी आढळल्या, त्यांची पूर्तता करण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या. अपूर्ण प्रस्तावांना आवश्यक कागदपत्रे सादर करण्यास सांगण्यात आले. त्यामुळे पात्र प्रस्तावांनाच मंजुरी देण्याची प्रक्रिया राबविण्यात आली.
भूखंड विक्रीलाही चालना
बांधकाम परवानग्यांसोबतच शहरातील विविध भागांतील ३० ले-आउट मंजुरीचे प्रस्तावही निकाली काढण्यात आले आहेत. त्यामुळे संबंधित भागांमध्ये नियोजनबद्ध भूखंड विकासाचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे. बांधकाम परवानग्या आणि ले-आउट मंजुरी अशा दोन्ही स्तरांवर निर्णय झाल्याने शहरातील बांधकाम क्षेत्रात नव्याने हालचाली वाढण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
दिवाळी मुहूर्ताला कामांचा सुरुवात शक्य
४०० बांधकाम प्रस्ताव आणि ३० ले-आउट मंजूर झाल्याने आता अनेक ठिकाणी प्रत्यक्ष बांधकाम सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर काही बांधकामांचे भूमिपूजन आणि प्रत्यक्ष कामांना सुरुवात होण्याची शक्यता आहे. तसेच नव्या ले-आउटमधील भूखंड विक्रीसाठी उपलब्ध होण्याच्या प्रक्रियेलाही वेग मिळू शकतो. त्यामुळे अनेक महिन्यांपासून मंजुरीच्या प्रतीक्षेत असलेल्या प्रस्तावांचा निपटारा हा बांधकाम क्षेत्रासाठी महत्त्वाचा निर्णय मानला जात आहे.
कोट
बांधकाम परवानग्या सर्व ऑनलाइन प्रक्रियाद्वारे होत असून ज्या अनुक्रमांकानुसार प्रकरणे आले आहे. त्या नुसार त्यांचा निपटारा केला जात असतो. बांधकाम प्रस्ताव मंजुरीसाठी संबंधित प्रकल्प, तेथील नियम, निकष आदीचा अभ्यास करून परवानग्या या द्याव्या लागतात.
- आदित्य जिवने, आयुक्त, महापालिका.