प्रवासी भाड्याचा वाद; प्रवाशाला मारहाण
जळगावातील घटना; रिक्षाचालकाने डोक्यात घातला रॉड
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ३१ : रेल्वेस्थानक ते सिंधी कॉलनी वर्सी महोत्सवाच्या ठिकाणी जाण्यासाठी रिक्षाचे भाडे कमी करण्याचा तगादा लावणाऱ्या प्रवाशावर खुन्नस ठेवून तो लघुशंका करत असताना रिक्षाचालकाने चक्क डोक्यात लोखंडी रॉड टाकत गंभीर जखमी केले. शहर पोलिस ठाण्यात याप्रकरणी रिक्षाचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ळीसगाव येथील पवन दीपककुमार मंदानी (वय-२६) कुटुंबीयांसह शुक्रवारी (ता. ३०) रात्री जळगावात वर्सी महोत्सवासाठी आले. पत्नीसह कुटुंबीयांना सेवामंडळात सोडून मंदानी व त्यांचे मित्र निखील खियाणी रेल्वेस्थानकाजवळील हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले होते. जेवण करून रेल्वेस्थानक रिक्षाथांब्याजवळ आले. एका रिक्षाचालकाला सिंधी कॉलनीत जाण्याविषयी विचारले असता त्याने ३० रुपये प्रति सीट सांगितल्याने तरुणाने २० रुपये देऊ असे सांगितले. त्याचा राग आल्याने रिक्षाचालकाने वाद घातला. नंतर मंदानी व त्यांचे मित्र बाजूला लघुशंका करत असता त्यांना रोखून पुन्हा वाद घातला. चालकाला समजवत असताना त्याने रिक्षातून लोखंडी रॉड आणून तो मंदानी यांच्या डोक्यात मारला. त्यामुळे त्यांना गंभीर दुखापत झाली.
चौकट
सोनसाखळी हिसकावली
त्यांचा मित्र भांडण सोडविण्यासाठी आला असता त्यालाही २ रिक्षाचालकांनी मारहाण केली. या प्रकरणी मंदानी यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून २ रिक्षाचालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरुणाला मारहाण करत असताना तरुणाच्या गळ्यातील १६ ग्रॅम वजनाची १ लाख २० हजार रुपये किमतीची सोन्याची साखळी व मोबाईल गहाळ झाला.