जळगाव जिल्हा बँक निवडणूक (लोगो)
---
महायुतीचे जागावाटप ठरले, आता माघारीकडे लक्ष
---
महाविकास आघाडीला तीन जागा दिल्या, तर निवडणूक होणार बिनविरोध
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १५ : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसची महायुती ठरली आहे. भाजपला १० जागा, शिवसेना ७, राष्ट्रवादी काँग्रेसला ४ जागा असे सूत्र ठरले आहे. असे असले तरी अनेक ठिकाणी महायुतीच्या उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. त्यात नेमकी कोण माघार घेते, याकडे आता लक्ष लागले आहे. माघारीसाठी सोमवार (ता. १६) व मंगळवार (ता. १७) असे दोनच दिवस शिल्लक आहेत.
दरम्यान, महायुतीने तीन जागा महाविकास आघाडीला सोडल्या, तर ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे. मुक्ताईनगर, चोपडा, बोदवडच्या जागांवर महायुतीचा अजून निर्णय झालेला नाही. तो वाद सोमवारपर्यंत मिटेल, अशी शक्यता आहे.
ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी महायुतीचे प्रयत्न सुरू आहेत. दुसरीकडे महाविकास आघाडीने तीन जागांची मागणी केली आहे. त्या जागा महायुतीने सोडल्या तर ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात आहे.
जागावाटप, महाविकास आघाडीला सोबत घ्यायचे किंवा कसे याबाबत जलसंपदामंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील आदी पदाधिकाऱ्यांच्या रात्री एका हॉटेलमध्ये बैठक सुरू होती. आता माघारीनंतरच चित्र स्पष्ट होईल.
-------
महायुतीच्या निर्णयाकडे लक्ष
महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांच्या जिल्हाध्यक्षांची बैठक शनिवारी (ता. १४) झाली. तीत महायुतीने तीन जागा दिल्या, तर निवडणूक बिनविरोध करू, अन्यथा निवडणूक बिनविरोध होणार नाही, असे ठरले आहे. महाविकास आघाडीच्या या प्रस्तावाला महायुतीचे नेते कसा प्रतिसाद देतात, याकडेही लक्ष लागून आहे.