सेकंड मेन
NSK26H33483
जळगाव : रस्त्यावरील अतिक्रमण केलेल्या हॉकर्सधारकांना अतिक्रमण काढण्याच्या सूचना देताना महापौर दीपमाला काळे. सोबत नगरसेवक नरेंद्र पाटील आदी.
---
अतिक्रमणे हटवा, अन्यथा दंडात्मक कारवाई
महापौर काळेंची प्रभाग आठमध्ये पाहणी; अस्वच्छ भूखंड, धोकादायक घरांबाबत निर्देश
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. २४ : रस्त्यांवरील अतिक्रमणे हटविणे, गटारींची सफाई सुकर करणे आणि अस्वच्छ मोकळ्या भूखंडांवर कारवाई करण्याचे निर्देश महापौर दीपमाला काळे यांनी शनिवारी (ता. २४) दिले. ‘महापौर स्वच्छता संकल्प अभियाना’अंतर्गत प्रभाग क्रमांक आठमध्ये पाहणी करताना त्यांनी स्वच्छतेसह आरोग्य, शिक्षण आणि नागरी सुविधांचा आढावा घेतला.
छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात भाजीविक्रेते रस्त्यावर बसत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याचे निदर्शनास आले. संबंधित अतिक्रमणे तातडीने हटवून विक्रेत्यांनी रस्त्याच्या बाजूला व्यवसाय करावा, अशा सूचना महापौरांनी दिल्या. काही गटारींवर पक्के ढापे असल्याने सफाईत अडचणी येत असल्याचे लक्षात आल्यानंतर ढापे हटवून जाळ्या बसविण्याचे निर्देशही त्यांनी दिले. यावेळी नगरसेवक नरेंद्र पाटील, कविता पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. स्वच्छतेच्या कामांचे व्हॉट्सॲपद्वारे नियमित अद्ययावत ठेवणाऱ्या स्वच्छता निरीक्षक महेश ठाकूर यांच्या कार्यपद्धतीचे महापौरांनी कौतुक केले. सोमवारी प्रभाग क्रमांक नऊमध्ये अभियानांतर्गत पाहणी होणार आहे.
भूखंड मालकांना नोटीस द्या
महापालिकेच्या नंदराम बिर्ला शाळेला भेट देत त्यांनी शिक्षकांशी संवाद साधला. शाळेच्या दोन्ही बाजूंच्या तुटलेल्या भिंतींची तातडीने दुरुस्ती करण्यास बांधकाम विभागाला सांगितले. मोकळ्या भूखंडांवरील कचरा व झाडेझुडपे हटविण्यास विरोध करणाऱ्या मालकांना नोटिसा बजावून आवश्यकतेनुसार दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले.
चौकट
रथ चौकात पाणी गळती
शनी मंदिराजवळील मोकळ्या जागेतील अस्वच्छता दूर करणे, स्वस्त धान्य दुकानाजवळील कचरा उचलणे आणि पिंप्राळा गावठाणातील धोकादायक, पडक्या घरांबाबत कारवाई करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. रथ चौकातील पाणीगळतीवरून महापौरांनी संबंधित कर्मचाऱ्यांना जाब विचारत तातडीने दुरुस्ती करण्यास सांगितले.