ॲंकर
NSK26H31924
जळगाव : संगीता घुगे यांना चोरीतील मुद्देमाल परत करताना पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर अधीक्षक संदीप गावित, डीवायएसपी नितीन गणापुरे, निरीक्षक बबन आव्हाड आणि त्यांचे पथक.
----
चाेरीला गेलेला मुद्देमाल परत मिळाल्याने सुखद धक्का
घरफोडीतील ३२ लाखांचा मुद्देमाल पोलिस प्रशासनाकडून फिर्यादीला परत
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १० : घरफोडीच्या गुन्ह्यात हस्तगत केलेले तब्बल ३२ लाख १८ हजार ८०० रुपये किमतीचे सोने-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम एमआयडीसी पोलिसांनी मूळ फिर्यादीला परत केली आहे. घरफोडीत चोरीला गेलेला ऐवज पुन्हा मिळेल, याची अपेक्षा धुसर होत असताना एमआयडीसी पोलिसांनी गुन्ह्याचा छडा लावून फिर्यादी संगीता राजू घुगे यांना त्यांचे दागिने व रोकड परत मिळाल्याने त्यांनी पोलिसांचे आभार मानले.
एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील महाजन नगर, रामेश्वर कॉलनी परिसरात राहणाऱ्या संगीता राजू घुगे यांच्या बंद घराचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी घरातील सोने-चांदीचे दागिने व रोख रक्कम लांबविली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दाखल गुन्ह्यात गुन्हे शोध पथकाने अथक परिश्रमातुन, तांत्रिक माहिती संकलित केली, तसेच गुप्त बातमीदाराच्या माहितीच्या आधारे संशयितांना अटक करुन चोरीतील ऐवज पूर्णपणे हस्तगत करण्यात यश मिळविले आहे.
न्यायालयीन प्रक्रिया
जप्त मुद्देमाल परत मिळावा, यासाठी फिर्यादी संगीता घुगे यांनी जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यावर निर्णय होऊन एमआयडीसी पोलिसांनी एकूण ३२ लाख १८ हजार ८०० रुपये किमतीचे सोने-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम मूळ फिर्यादीकडे सुपूर्द करण्यात आली.
चौकट
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
तक्रारदारांना जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक संदीप गावित आणि उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या उपस्थितीत ऐवज परत करण्यात आला. यावेळी वरिष्ठ पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या गुन्हे शोध पथकाची उपस्थिती होती.