वेतन थांबविण्याच्या आदेशपत्र वितरणास सुरुवात
(उपशीर्षक)
शालार्थ आयडी घोटाळा; संस्थाचालकांकडून फायलीही मागविल्या
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. २६ : बोगस वैयक्तिक मान्यता आणि शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणी नाशिक विभागीय कार्यालयाकडून माध्यमिक शिक्षण विभागाला मिळालेल्या आदेशानुसार, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन थांबविण्याचे आदेशपत्र संस्थाचालक व संबंधित शिक्षकांना देण्यास सुरुवात झाली आहे.
दरम्यान, सोमवारी (ता. २६) जिल्हा परिषदेच्या विद्यानिकेतन शाळेत शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी घोटाळ्यात समाविष्ट असलेल्या संस्थाचालकांकडून काही फायली मागवून जमा केल्या आहेत.
जिल्ह्यातील बोगस वैयक्तिक मान्यता आणि शालार्थ आयडी घोटाळ्याप्रकरणी शिक्षण विभागाने मोठी कारवाई केली आहे. या घोटाळ्याद्वारे शासनाची सुमारे १६० कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप असून, जळगाव जिल्हा या संपूर्ण प्रकरणाचे मुख्य केंद्र बनला आहे. या घोटाळ्यात सर्वाधिक प्रकरणे जळगाव जिल्ह्यातील आहेत. नाशिक विभागातील ८९३ मान्यता रद्द होणार असून, जळगाव जिल्ह्यातील ६५० मान्यता रद्दचे आदेश आहेत.
...तर त्यांच्यावर गुन्हे दाखल
कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक मान्यता आणि शालार्थ मान्यता रद्द करण्यासह शासकीय वेतन अनुदान थांबविण्याची कार्यवाही आता होणार आहे. शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी संबंधित संस्थाचालक, तत्कालीन मुख्याध्यापक आणि लाभार्थी कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. चौकशी करून काहींवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश आहेत.
चौकट
शिक्षणाधिकारी नाशिकला
शालार्थ आयडी घोटाळ्याबाबत कारवाईला वेग आला असून, माध्यमिक शिक्षण विभागातील आजी-माजी शिक्षणाधिकाऱ्यांसह काही कर्मचारी रडारवर आहेत. या प्रकरणी माध्यमिक शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण सोमवारी (ता. २६) नाशिकला गेल्या होत्या. याबाबत माध्यमिक शिक्षण विभागाकडून माहिती देण्यास टाळाटाळ केली जात आहे.