NSK26H33106
जळगाव : संशयित दीपेश रूपानीबरोबर पथकासह पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, निरीक्षक नितीन पाटील आदी.
---
गुंतवणुकीच्या नावे सव्वाकोटीचा गंडा
---
म्होरक्यास बडनेरा रेल्वेस्थानकावर अटक; धावत्या रेल्वेतून पळताना पोलिसांची झडप
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. २० : थेट उत्पादने विक्री करणाऱ्या एका कंपनीच्या नावे नागरिकांना एक कोटी २३ लाख ८६ हजार रुपयांचा गंडा घालून वर्षभरापासून फरारी असलेला संशयित दीपेश कमलेश रूपानी (रा. सुमन रेजिडेन्सी, जळगाव) याला जळगाव आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने सिनेस्टाइल पाठलाग करून बडनेरा रेल्वेस्थानकावर अटक केली. धावत्या रेल्वेतून उतरून पसार होण्याच्या प्रयत्नात असताना, पोलिसांनी त्याला पकडले.
कंपनीत गुंतवणुकीचे आमिष दाखवून दोघांची एक कोटी २३ लाख ८६ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी फेब्रुवारी २०२५ मध्ये रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग आहे. मुख्य संशयित दीपेश रूपानी दीड वर्षापासून फरारी होता. पोलिसांनी जोधपूर, अमरावती, खामगाव, बडनेरा येथे त्याचा शोध घेतला. तो ठिकाणे व मोबाईल क्रमांक बदलत होता. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी त्याने टक्कल करून पेहरावही बदलला. अखेर एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने त्याचे विविध पेहरावांतील छायाचित्रे तयार करून पोलिसांनी त्याला शोधून काढले.
धावत्या रेल्वेतून घेतली उडी
दीपेश रूपानी मुंबई ते नागपूर दुरांतो एक्स्प्रेसने प्रवास करीत असल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेचे निरीक्षक नितीन पाटील यांना मिळाली. त्यांच्यासह सहायक निरीक्षक ईश्वर पाटील, सहायक फौजदार विजय निकुंभ, प्रीतमकुमार पाटील, समाधान पाटील, घनश्याम पवार, विजय शिरसाठ भुसावळ स्थानकावरून दुरांतो एक्सप्रेसमध्ये चढले. त्यांनी धावत्या रेल्वेत दीपेशचा शोध घेतला. बडनेरा रेल्वेस्थानकावर रेल्वेचा वेग कमी होताच त्याने एक्स्प्रेसमधून उडी घेत पळ काढला. मात्र, पोलिसांनी झडप घालून रूपानीला ताब्यात घेतले.
चौकट
पोलिसांकडून आवाहन
कंपनीच्या नावाने फसवणूक करण्याचे आमिष दाखवून इतरही कोणाची फसवणूक झाली असेल, तर फसवणूक झालेल्या नागरिकांनी आर्थिक गुन्हे शाखेशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.