मेन फिचर टुडे ४
---
(बंद पथदीपांचा संग्रहित फोटो वापरावा)
---
करार झाला, कार्यादेशही निघाला; तरी पथदीप बंदच
आठ हजार दिव्यांच्या दुरुस्तीचे काम रखडले; दिवाळीतही अनेक भागांत अंधार, नागरिकांची नाराजी
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १४ : दिवाळीच्या सणात संपूर्ण शहर प्रकाशाने उजळून निघेल, अशी अपेक्षा असताना जळगावकरांना मात्र अनेक भागांत अंधाराचा सामना करावा लागला. शहरातील बंद आणि मंद प्रकाश देणाऱ्या सुमारे आठ हजार पथदीपांच्या दुरुस्ती व बदलण्याचे काम अद्याप सुरू झालेले नाही. विशेष म्हणजे, या कामासाठी महापालिकेने एजन्सीसोबत करारनामा करून अधिकृत कार्यारंभ आदेशही दिला आहे. मात्र, दिवाळी उलटून गेल्यानंतरही प्रत्यक्ष कामाला सुरुवात न झाल्याने महापालिकेच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित होत आहेत.
शहरात सुमारे २२ हजार पथदीपांचे खांब आहेत. त्यापैकी जवळपास दोन हजार ४०० दिवे पूर्णपणे बंद आहेत, तर सुमारे पाच हजार दिव्यांचा प्रकाश मंदावला असून ते पिवळसर प्रकाश देत आहेत. त्यामुळे शहरातील जवळपास आठ हजार पथदीपांची दुरुस्ती अथवा बदल करणे आवश्यक आहे. अनेक प्रमुख रस्ते, चौक आणि अंतर्गत भागांमध्ये पुरेसा प्रकाश नसल्याने रात्रीच्या वेळी नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
करारानंतरही कामाची प्रतीक्षाच
पथदिव्यांच्या देखभाल-दुरुस्ती, नवीन एलईडी दिव्यांचा पुरवठा आणि अद्ययावत सीसीएमएस प्रणाली उभारण्यासाठी महापालिकेने तेलंगणातील ''मेसर्स बीएसी इन्फ्राटेक प्रायव्हेट लिमिटेड'' आणि ''मेसर्स व्हिंक्शन ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड'' या संयुक्त एजन्सीला काम दिले आहे. दहा वर्षांच्या करारानुसार हे काम केले जाणार आहे. कार्यादेशानंतर काम सुरू करण्यापूर्वी साहित्य संकलन व पूर्वतयारीसाठी ३० दिवसांची मुदत देण्यात आली होती. मात्र, प्रत्यक्ष कामाला अद्याप सुरुवात झालेली नसल्याचे चित्र आहे.
चौकट
नागरिकांच्या अपेक्षांवर पाणी
दिवाळीपूर्वी शहरातील पथदिवे सुरू होतील, अशी अपेक्षा नागरिकांना होती. मात्र, सणाच्या दिवसांतही अनेक रस्ते अंधारात राहिल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. रात्रीच्या वेळी वाहनचालक, पादचारी आणि महिलांना अंधाऱ्या रस्त्यांवरून ये-जा करताना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. आता तरी महापालिका प्रशासनाने संबंधित एजन्सीकडून काम सुरू करून घेण्यासाठी ठोस पावले उचलावीत आणि शहरातील पथदिव्यांचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी होत आहे.